@maharashtracity

मुंबई: दिवाळीच्या तोंडावर असताना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या अन्न पदार्थ तसेच तेल उत्पादकांवर कारवाई केली आहे. या आस्थापनांमधील अन्नाचे तसेच तेलाचे नमुने घेण्यात आले असून अन्न सुरक्षा कायद्याचे उलंघन झाल्याचे आढळल्याने येथील अन्न पदार्थ तसेच उर्वरित तेल साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत एकूण ५४ अन्न नमुने विश्लेषणास घेण्यात आले असून २ कोटी ४६ लाख ५० हजार ७५३ रुपयांचा साठा जप्त केला आहे.

या कारवाईत मे. जी.पी.एस. ऑईल इंडस्ट्रीज, मे. जे. जे. ट्रेडिंग कंपनी, मे. श्री गणेश मिल्क प्रोडक्ट्स या ठिकाणी कारवाई करण्यात आली. सण- उत्सवाच्या काळात बाजारपेठेत खाद्यतेल व दुग्धजन्य अन्नपदार्थाना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या काळात खाद्यतेल, वनस्पती इ. अन्नपदार्थामध्ये भेसळ होण्याची तसेच कमी दर्जाचे अन्नपदार्थ उत्पादन व विक्री होण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांना सुरक्षित, आरोग्यदायी व सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, याकरीता अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने अन्न आस्थापनांच्या तपासण्या व अन्न नमुने तपासणीसाठी घेण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. तसेच अन्न सुरक्षा कायद्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कड़क कारवाई करण्यात येणार असल्याचे एफडीएचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here