Twitter : @NalavadeAnant

मुंबई

ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीदवाक्य असलेल्या मुक्त विद्यापीठाने ज्या विद्यार्थ्यांनी अर्धवट शाळा सोडली आहे. त्यांना पुन्हा शाळेत प्रवेश आणि नंतर महाविद्यालयात प्रवेश मिळेल असे नवीन अभ्यासकेंद्र तयार करायचा प्रस्ताव तयार करावा.शिक्षणापासून वंचित असलेल्या घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या शैक्षणिक अडचणी संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, उच्च शिक्षणा बरोबरच शालेय शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नवीन अभ्यासकेंद्र तयार करता येतील का या बाबतचा प्रस्ताव मुक्त विद्यापीठाने तयार करून संबंधित विभागाला पाठवावा. त्यामुळे जे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणता येईल आणि त्यांना पुढील उच्च शिक्षण घेता येईल.

उच्च शिक्षणामध्ये व्यवसायिक उपयोजित व कौशल्यधिष्टीत शिक्षणक्रमांचे जिल्हा केंद्रावर आयोजन करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम तयार करावेत, अशा सूचनाही पाटील यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीत शैक्षणिक सुविधा, जिल्हा केंद्र समन्वयक, जिल्हा केंद्रप्रमुख मानधन, शैक्षणिक गुणवत्ता वाढ करणे, आरोग्यमित्र, रुग्ण सहाय्यक प्रमाणपत्र अभ्यासक्रम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here