३०० रुग्णांवर यशस्वी उपचार -: पालिका

@maharashtracity

मुंबई: मुंबई शहर व उपनगरे भागात मागील दोन आठवड्यांपासून डोळ्यांची साथ (डोळे येणे) वाढली आहे. महापालिकेच्या मुरली देवरा मनपा नेत्र रुग्णालयामध्ये गेल्या १५ दिवसांत नेत्र विकाराने त्रस्त २५० ते ३०० रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत, अशी माहिती देताना पालिकेने एकप्रकारे त्याची कबुलीच दिली आहे.

ही बाब लक्षात घेता, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि त्रास जाणवल्यास तातडीने नेत्र तज्ञांकडून सल्ला व औषधोपचार घ्यावेत, असे आवाहनही महापालिका प्रशासनाच्या वतीने कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

मुंबईत सध्या डोळ्यांची साथ पसरली आहे. मात्र, सामान्य नागरिकांना अशा वेळी काय उपचार करावेत हेच कळत नाही. काही जण गावठी किंवा आयुर्वेदिक उपचार करण्याचा प्रयत्न करतात. त्यात काहींना यश येते तर काहींना अधिकचा त्रास होतो. त्यामुळे पालिका आरोग्य खात्याने, ज्यांना डोळ्यांना असा काही त्रास जाणवत असेल तर त्यांनी पालिकेच्या डोळ्यांच्या रुग्णलयात जाऊन तपासणीकरून योग्य ते औषधोपचार घ्यावेत, असे आवाहनही पालिकेतर्फे करण्यात आले आहेत.

डोळ्याच्या साथीचे कारण विषाणूजन्य -: डॉ. रोकडे

पावसाळ्यात हवेतील दमटपणा वाढला की वातावरण संसर्गजन्य रोगांसाठी पोषक ठरते. त्यामुळे दरवर्षी या दिवसात इतर आजारांबरोबर नेत्र संसर्ग अर्थात डोळे येण्याची साथ पसरते. सध्या या साथीचे कारण विषाणूजन्य आहे, असे आढळून येत आहे, अशी माहिती पालिकेच्या मुरली देवरा मनपा नेत्र रुग्णालयाच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी वर्षा रोकडे यांनी दिली आहे.

डोळ्यांच्या साथीची लक्षणे

नेत्र संसर्गाच्या साथीमध्ये सुरुवातीला एका डोळ्याला संसर्ग होतो. त्यानंतर दुसऱ्या डोळ्याला देखील संसर्ग होतो. डोळ्यात काहीतरी गेल्यासारखे वाटते आणि सतत डोळ्यांमधून पाणी देखील येते. डोळे लाल होतात. सुरुवातीला ही लक्षणे एका डोळ्यास जाणवतात व त्यानंतर दुसऱ्या डोळ्याला देखील जाणवतात. काही वेळा डोळ्यातून चिकट द्रव पदार्थ बाहेरील बाजूस येत असतो. तसेच डोळ्यांना आतील बाजूस सूज येते. डोळ्यांना खाज येते. डोळे जड वाटतात आणि तीव्र प्रकाश सहन होत नाही. या प्रकारच्या संसर्गामुळे काही लोकांना ताप देखील येतो.

रुग्णाने कोणती काळजी घ्यावी ?

डोळ्याच्या साथीच्या संसर्गाने बाधित रुग्ण आढळून येऊ लागल्याने पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी मुंबईतील नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. डोळे आले असतील अशा वेळी डोळ्यांना सतत हात लावू नये. तसेच डोळ्यांना स्वच्छ पाण्याने वारंवार धुत रहावे. डोळे पुसण्यासाठी स्वच्छ रुमालाचा उपयोग करावा आणि डोळ्यांना वारंवार स्पर्श करू नये. कुटुंबातील अन्य सदस्यांना संसर्ग होऊ नये म्हणून नेत्र संसर्ग असेपर्यंत कुटुंबापासून वेगळे / सुरक्षित अंतर राखून रहावे. तसेच कोणत्याही प्रकारचा घरगुती उपाय न करता, वैद्यकीय तज्ञांचा / नेत्र उपचार तज्ञांचा सल्ला घ्यावा. त्यांच्या सल्ल्यानेच उपचार आणि औषधी घ्याव्यात.

योग्य वेळेवर उपचार घेतल्यावर ५ ते ६ दिवसांत डोळे बरे होतात. एकदा डोळे येऊन गेले की, परत त्या व्यक्तीला संसर्ग होत नाही, असे नाही. एकदा नेत्र संसर्ग होवून बरे होवूनही पुन्हा त्या व्यक्तीस संसर्ग होवू शकतो. त्यामुळे निष्काळजीपणा करणे योग्य नाही. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये विनामूल्य निदान आणि उपचार पुरवले जातात. नेत्र संसर्ग प्राथमिक लक्षणे जाणवू लागताच तातडीने उपचार करून घ्यावेत, असे आवाहन पुन्हा एकदा महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here