Twitter : @maharashtracity
मुंबई
बेस्टमधील कंत्राटी कर्मचारी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात संपावर गेले होते. त्यांचे म्हणणे समजावून घेऊन ते मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. त्यानंतर कर्मचारी कामावर रुजू झाले. दरम्यान, बेस्ट महाव्यवस्थापकांसोबत झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांना सध्या आश्वासन देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार मोफत प्रवास, रजा, बेसिक पगारात महिना १,२०० रुपये वाढ आदी मागण्यांची पूर्तता करण्यात येणार असल्याची माहिती कंत्राटी कामगारांच्या प्रतिनिधींनी दिली.
दरम्यान बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंघल, बसचे ठेकेदार व कामगारांचे प्रतिनिधी यांची मुंबईतील बेस्ट भवनात नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत कामगारांच्या मागण्या आणि प्रश्न यांवर चर्चा झाली. कामगारांच्या बोनस, रजा, मोफत पास, न्यायालयीन केसेस आदी सर्व मागण्या मंजूर करून त्यांच्या महिना बेसिक पगारात रुपये १२०० ची वाढ करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीत शिंदे गट शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के, महाराष्ट्र राज्य कामगार सेनेचे अध्यक्ष जेरी डेव्हिड, माजी नगरसेवक किरण लांडगे, नागेश टवटे, सुरेश तोडकर, रघुनाथ खजूरकर आदी कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत बेस्ट उपक्रमाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने सर्व कामगारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. दरम्यान, याबाबत बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यांच्याकडून मात्र प्रतिसाद मिळाला नाही.