एका महिलेचा मृत्यू, तर एक महिला अत्यवस्थ
By Anant Nalawade
Twitter: @nalawadeanant
मुंबई: एमआयडीसी च्या भुखंडाची बोगस कागदपत्रे तयार करून जमीन हडपल्याप्रकरणी वारंवार पाठपुरावा करूनही सरकार दखल घेत नसल्याने मंत्रालयाच्या दारात धुळ्याच्या एका महिलेने विष प्राशन केले. आज या महिलेचा मृत्यू झाला असून एकाच दिवशी तिघांनी मंत्रालयाच्या समोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.
एमआयडीसी भुखंड प्रकरणी धुळ्याच्या शितल गादेकर या महिलेने सोमवारी विष प्राशन केले होते. तिला जे जे रुग्णालयातील उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, आज दुर्दैवाने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
तर, नवी मुंबईतील संगीता डवरे या महिलेचे पती नवी मुंबई पोलिस दलात कार्यरत असून त्यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात जखमी महिलेच्या पतीवर रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यवस्थित उपचार न केल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी, याबाबत तक्रार नोंदवली होती. संबंधित डॉक्टरांवर कारवाई होत नसल्याचा कारणाने तिने काल येऊन मंत्रालयसमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. संगीता यांच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
तर तिसऱ्याघटनेत पुण्याच्या मावळ तालुक्यातील रमेश मोहिते यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. अपंगांना अनुदानात वाढ करून देण्यात यावी. यासाठी रमेश मोहिते यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना ४१ ची नोटीस देण्यात आलेली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
सोमवारी शितल गादेकर या मंत्रालयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आल्या. त्यांची भेट न झाल्याने त्यांनी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती खालावली. तातडीने त्यांना राज्य सरकारच्या जे जे रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. आज त्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवाने मृत्यू झाला.