Twitter :@maharashtracity

मुंबई

ईशान्य मुंबईतील मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम वॉर्डात झिका वायरसचा संसर्ग झालेला रुग्ण आढळला असून रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, त्या परिसरात कसून तपासणी सुरु आाहे. मात्र काळजी करण्याचे कारण नसून प्रतिबंधात्मक उपायोजना सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, झिका या आजाराचा पहिला रुग्ण मुंबईत सापडल्याने मुंबई महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे.  

मुंबईच्या एम पश्चिम विभागातील ७९ वर्षीय व्यक्तीला १९ जुलै पासून ताप, सर्दी आणि खोकला अशी लक्षणे होती. त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर, २ ऑगस्ट रोजी त्यांना डिस्जार्च देण्यात आला. या रुग्णाला झिका व्हायरसची लागण झाल्याचे पुण्याच्या नॅशनल व्हायरल इन्स्टिट्यूट यांनी कळवले असून काही दिवसांपूर्वी रुग्णाचे रिपोर्ट पुण्याला पाठवले होते. प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार या रुग्णाला झिकाचा संसर्ग झाल्याचे समजले. दरम्यान, झिकाचे आणखी काही रुग्ण सापडतात का हे पाहण्यासाठी पालिकेने सर्वेक्षण सुरु केले आहे. झिका व्हायरस रोग हा झिका व्हायरसमुळे होणारा सौम्य आजार आहे. हा आजार संक्रमित एडिस डासांमुळे पसरतो. एडिस डास डेंग्यू आणि चिकून गुनिया या आजारांचाही प्रसार करतात. हा आजार विषाणूजन्य असला तरी कोविडसारखा वेगाने पसरत नाही.

८० टक्के व्यक्ती लक्षणरहित :
झिका व्हायरस रोग हा एक स्वयं मर्यादित आजार आहे. झिका विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींपैकी ८० टक्के व्यक्ती लक्षणे नसतात.  महानगरपालिकेत या आजाराच्या चाचणीची सुविधा केईएम रुग्णालयात उपलब्ध आहे.

लक्षणेः
ताप, त्वचेवर पुरळ, डोळे येणे, स्नायू आणि सांधेदुखी, अस्वस्थता आणि डोकेदुखी

नागरिकांनी घाबरून जाऊ नये :

झिका विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचाही शोध घेतला जात असून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिल्या आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता डासांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असेही डॉ. सुधाकर शिंदे यांनी मुंबईतील नागरिकांना आवाहन केले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here