मुंबई महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून अवकाळी पाऊस (unseasoned rain) सुरूच आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका राज्याला बसला आहे. त्यातच हवामान विभागाने (IMD) व्यक्त केलेल्या अंदाजानुसार या पावसाची तिव्रता आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस मुसळधार पाऊस (heavy rain) पडू शकतो. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून, चक्रीवादळाची (Hurricane) निर्मिती होत आहे. चक्रीवादळामुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातील किनारपट्टी प्रदेशात मोठ्या हवामान बदलाची शक्यता आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचे झाल्यास येत्या दोन ते तीन दिवसांत या वादळाचा काही प्रमाणात राज्याला देखील तडाखा बसू शकतो. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात राज्यात 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहू शकतात असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

राज्यासह देशात सध्या ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. कुठे उष्णतेची लाट (heat wave) पाहायला मिळत आहे. तर कुठे अवकाळी पावसाचा तडाखा बसताना दिसत आहे. पुढील काही दिवस महाराष्ट्रात काही भागात जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. कोकण, मराठवाड्यासह विदर्भात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त इतर भागात उष्णतेच्या झळा बसण्याची शक्यता असून काही ठिकाणी तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअस वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

दक्षिण कोकण (Konkan) आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी, उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ तसेच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील (Marathwada) काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा पाहायला मिळणार असून हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील (Vidarbha) जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्याभरापासून राज्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढलं आहे. राज्यात एकीकडे तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना विदर्भात सलग आठवडाभर पावसाची हजेरी लागताना दिसत आहे. पुढील तीन दिवसही विदर्भातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडासह 30-40 किमी प्रति तास सोसाट्याच्या वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here