महाड

X: @milindmane70

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमुळे महाड (Mahad) तालुक्यात मोठ्या प्रमाणात डोंगराळ भाग असून तालुक्याचा ८० टक्के भाग डोंगराच्या पायथ्याशी आणि दऱ्या खोऱ्यात वसलेला आहे. २००५ मध्ये महाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात दरड कोसळून (landslide in Mahad) शेकडो लोकांना जीव गमवावे लागले होते. तेव्हापासून सातत्याने १८ वर्ष पावसाळ्यात दरडीचा धोका कायम आहे. मात्र प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना अद्याप करण्यात आलेली नाही. पावसाळा सुरू होण्यास केवळ काही दिवसाचा अवधी असताना महसूल खाते सुस्त झोपी गेल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

मागील वर्षी महाड तालुक्याला पर्जन्यवृष्टीचा फटका बसला होता. त्याचीच पुनरावृत्ती या वर्षी देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील ७२ गावातील हजारो नागरिकांना दरड प्रवण क्षेत्रामधून भूस्खलन होण्याच्या शक्यतेने स्थलांतरित (temporoty displaceement) करावे लागणार असल्याची माहिती महाड महसूल विभागाकडून देण्यात आली. तालुक्यात दरवर्षी ३००० ते साडेतीन हजार मिलिमीटर एवढ्या मोठ्या प्रमाणात महाड तालुक्यात पाऊस पडतो.  

तालुक्यात जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होते. तालुक्यातील संभाव्य दरडग्रस्त गावातील नागरिकांना व प्रशासनाला देखील येत्या पावसाळ्यात नैसर्गिक आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. मात्र शासनाकडे पूर्व संदेश देणारी किंवा संकेत देणारी यंत्रणा नसल्याने दुर्गम व डोंगराळ भागात अतिवृष्टी कशाप्रकारे होते, यावरच सर्व काही अवलंबून आहे.

सन २००५ नंतर तालुक्यात दरडीचा धोका कायमच आहे. भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्वेनुसार यंदा संभाव्य धोका असलेली ७२ गावे आहेत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या तळीये गावची दुर्घटना (Taliye landsliding incident) पहिली तर डोंगर भागात असलेल्या संभाव्य ७२ गावांपैकी कोणत्याही गावात भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या गावांच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे गरजेचे आहे.

तालुक्यातील ७२ गावातील हजारो बाधित कुटुंबातील नागरिकांना स्थलांतरित करावे लागणार आहे. त्या गावांची नावे पुढील प्रमाणे : लोअर तुडील, नामावले कोंड, शिंगरकोंड मोरेवाडी, आंबिवली पातेरीवाडी, कोंडीवते मूळ गावठाण, सव, सोनघर, जुई बुद्रुक, चांढवे खुर्द, रोहन, वलंग, कोथेरी जंगमवाडी, माझेरी, पारमाची वाडी, कुंबळे, कोसबी,वामने, चिंभावे बौद्धवाडी, वराठी बौद्धवाडी, चोचिंदे, चोचिंदे कोंड, गोठे बुद्रुक, आदिस्ते, खैरे तर्फे तुडील, कुर्ला दंडवाडी, रावतळी मानेचीधार, मोहोत सुतारवाडी, मांडले, पिंपळकोंड, मुमुर्शी आंब्याचा कोंड, मुमुर्शी गावठाण, मुमुर्शी बौद्धवाडी, वीर गाव, वीर मराठवाडी, टोळ बुद्रुक, दासगाव भोईवाडा, तळोशी, बिरवाडी वेरखोले, करंजखोल, नडगाव काळभैरव नगर, पुनाडेवाडी, पाचाडवाडी, सांदोशी हेटकर कोंड, शेलटोळी, अंबेशिवथर, वाळण बुद्रुक, नामे नाची, कोंडीवते नवीन, हिरकणी वाडी, पाचाड परडी वाडी, वाघेरी आदिवासी वाडी, कोथेरी तांदळेकर वाडी, करंजाडी म्हस्के कोंड, नातोंडी धारेची वाडी, गोंडाळे, खर्डी, पांगारी मनवेधार, वरंध पोकळे वाडी, वरंध बौद्धवाडी, आड्राई, वाळण झोळीचा कोंड, वाळण केतकीचा कोंड, भीवघर, पिंपळवाडी, रुपवली, निगडे, बारसगाव, कोथेरी, ओवळे, खरवली, तळीये. या ७२ गावातील हजारो नागरिकांना निवारा शेडमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करावे लागणार आहे.   

तालुक्यात आपत्ती निवारण यंत्रणेमार्फत (Disaeter Management Agency) मागील १८ वर्ष फक्त पावसाळापूर्वी दरडीचा धोका असलेल्या गावांना नोटिसा बजावण्याव्यतिरिक्त कोणतीच ठोस उपाययोजना केली गेली नाही. त्यामुळे दरडग्रस्त गावे आजही धोकादायक स्थितीत आहेत. आजची परिस्थिती पहिली तर १० मे पासूनच पावसाला सुरवात झाली आहे. हा जरी अवकाळी पाऊस असला तरी पावसाळ्यात होते त्या प्रमाणे पाऊस पडत आहे.  

शासकीय पातळीवर नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने संभाव्य भूस्खलन आणि पुराची शक्यता लक्षात घेवून स्थानिक नागरिकांना स्थलांतर करणे, स्थलांतर करण्यासाठी निवारा व्यवस्था, महाड शहरात पूर परिस्थितीत लागणारी बचाव यंत्रणा, संपर्क साधनांची उपाययोजना, बोटींची व्यवस्था, पूरपरिस्थितीत दूरध्वनी यंत्रणा कोलमडते, अशा वेळी मोबाईल यंत्रणा देखील काम करत नाही. याकरिता वॉकीटॉकी यंत्रणा देखील अद्याप सज्ज केलेल्या नाहीत. संभाव्य दरडग्रस्त व पूर परिस्थिती बाबत निर्माण होणाऱ्या धोकादायक स्थितीवर मात करण्यासाठी कोणतीच तयारी करण्यात आलेली दिसून येत नाही. संभाव्य दरडग्रस्त गावांना सुमारे 18 वर्ष खबरदारीच्या उपाययोजना म्हणून नोटीस बजावल्या जातात, त्या देखील अद्याप बजवण्यात आलेल्या नाहीत. 

संभाव्य दरडग्रस्त गावातील नागरिकांना खबरदारीकरिता व सोपस्कार पार पाडावे म्हणून या महिन्याच्या शेवटी नोटिसा बजावण्यात येतील. धोकादायक परिस्थिती उद्भवल्यास शाळा, समाजमंदिर, मंदिर, अंगणवाडी अशा ठिकाणी या नागरिकांची व्यवस्था करण्यात येईल, असे महाडचे निवासी नायक तहसीलदार बी वाय भाबड यांनी सांगितले.

संभाव्य भूस्खलनाला तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार जबाबदार! 

तालुक्यात मागील दहा वर्षात जेवढे उत्खनन झाले नाही, तेवढे उत्खनन चालू वर्षी विकासाच्या नावाखाली फार्म हाऊस व खाजगी विकासकांनी प्लॉट पाडण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर केले आहे. त्यामध्ये करोडो रुपयांची रॉयल्टी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी बुडवून लाखो रुपयांची “माया” जमा केली आहे, या भ्रष्टाचारी तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम नायब तहसीलदार भाबड यांनी केल्याची चर्चा महसूल कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ऐकण्यास मिळत आहे. महाड तालुक्यात तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उत्खनन होत असताना बुडवलेल्या रॉयल्टीची व महसुलाची तहसीलदार महेश शितोळे व विभागीय दंडाधिकारी (प्रांत) ज्ञानोबा बानापुरे हे वसुली करणार का? असा सवाल महाड तालुक्यातील नागरिक राज्याच्या प्रशासनाला व जिल्हाधिकारी जावळे यांना विचारत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here