By Milind Mane

Twitter : @manemilind70

महाड: महाराष्ट्रातील सरकार किल्ले रायगडावर समारंभ घेते, वेगवेगळे कार्यक्रम घेते, या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या पक्षाचे राजकीय नेते रायगडला येऊन जातात, छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतात, सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील सर्वजण सत्ता मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात, त्यांचे आशीर्वाद घेतात, परंतु छत्रपती शिवाजी महाराज ज्याप्रमाणे रयतेशी वागले, तसे मात्र सध्याचे सत्ताधारी वागत नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी महाड येथे बोलताना केला. 

राजू शेट्टी पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे, त्यांचा आशीर्वाद हवा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हयातीमध्ये खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य स्थापन केले, ते कुणासाठी केले? तर ते दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसासाठी शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी आणि त्याच्यासाठी. त्यांना खस्ता खाव्या लागल्या, दुष्काळ पडला त्यावेळी त्यांना तगाई दिली, कर्ज माफ केले, कर्ज देऊन बैल जोड्या खरेदी करण्यास सांगितले.  त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लावू नका, कोणी किती मोठा आहे, याचा मुलाहिजा न करता कडक शासन केले जाईल, अशा प्रकारच्या आज्ञापत्र त्यावेळी शिवाजी महाराजांनी काढली. 

छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे व रयतेचे राजे होते, परंतु येथे येणारे राजकीय नेते शेतकऱ्यांचे नावं घ्यायला तयार नाहीत. त्यांना फक्त सत्ता पाहिजे, आठवण मात्र त्यांना होत नाही.  या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना एक जुलै पासून म्हणजे कृषी दिनापासून 30 सप्टेंबर पर्यंत म्हणजे 90 दिवस राज्यात शेतकरी जनजागृती अभियान चालू करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी महाड येथे बोलताना स्पष्ट केले. 

शेतकरी जनजागृती अभियान सुरू करायचे ठरविले आहे. या दरम्यान पाच वर्षांपूर्वी शेतकऱ्याला पिकांमधून मिळणारे पैसे तसेच पाच वर्षांपूर्वी उत्पादन खर्च किती होता? आता किती आहे? शेतकऱ्याला त्या पिकांमधून हातात काय पडते? सरकारला किती कराच्या रूपाने टॅक्स जातो? आज सगळा लेखाजोखा करणारी पुस्तिका या जनजागृती अभियानाच्या दरम्यान महाराष्ट्रातील सर्व गावांमध्ये, शेतकऱ्यांपर्यंत पोचविल्या जाणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.  या अभियानाला सुरुवात करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घ्यावा, यासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक जुलै रोजी रायगडावर बोलवले आहे. हे जनजागृती अभियान 90 दिवस चालणार असून 30 सप्टेंबरला त्याचा समारोप होणार आहे. कोकणातील भात व आंब्याचा प्रश्न तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान याबाबत चकार शब्द काढायला कोणी तयार नाही, याबाबत सरकार उदासीन आहे.  तसेच कोकणाप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा येथील शेतकऱ्यांची देखील अशीच अवस्था आहे, याबाबत राज्यकर्ते उदासीन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

केवळ बापाचे नाव चालवायचे अशी अवस्था शेतकऱ्यांची आहे

राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून शेतकऱ्यांचा अधिकार काय हे शेतकऱ्यांना समजले पाहिजे.  केवळ नऊ तास काम करायचे व बापाचे नाव चालवायचे, अशी अवस्था शेतीची झाली आहे. शंभर रुपये शेतीमध्ये टाकायचे व अवघे सात रुपये परत शेतकऱ्याच्या हातात मिळायचे. अशी वर्षानुवर्षे तोट्यातली शेती शेतकरी करत चालला आहे.  यामुळे मागील वीस वर्षात दीड लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचा त्यांनी खळबळजनक दावा यावेळी राजू शेट्टी यांनी केला. एवढा मोठ्या प्रमाणात नरसंहार हा कुठल्या युद्धात झाला नाही, कुठल्या आपत्तीत झाला नव्हता, एवढा नरसंहार हा केवळ सरकारी धोरणामुळे झाला असून यामुळे शेती तोट्यात गेली आहे.  तरी कुणी गांभीर्याने या प्रश्नाकडे बघायला तयार नसल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. 

आरबीआय कडे तक्रार करणार!

शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीचे धोरण सरकारने राबवले.  शेतकऱ्यांनी बँकेकडून घेतलेले कर्ज सरकारने भरले. मात्र, सातबारावर अद्याप शेतकऱ्यांच्या कर्जाच्या नोंदी कायम असल्याबाबत राजू शेट्टी यांना विचारणा केली असता याबाबत सरकारने बँकांचे कान धरून सांगितले पाहिजे की कर्जमुक्ती केली म्हणजे सरकारने ते पैसे भरले आहेत.  याबाबत महसूल अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचा बोजा कमी करा, असे लेखी पत्र बँकांना देणे गरजेचे आहे.  मात्र शेतकऱ्यांच्या सातबारावर नोंदी अद्याप कायम असल्याने याबाबत आम्ही वेळ पडल्यास आरबीआयकडे जाऊन तक्रार करणार असल्याचे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here