एल अँड टी कंपनीच्या निकृष्ट दर्जाचे काम प्रवाशांच्या जीवावर बेतनार?

By Milind Mane

Twitter: @manemilind70

महाड: मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर एल अँड टी कंपनीने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा फटका महामार्गावरील प्रवाशांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज पहिल्याच पावसात महाडजवळील नीलकमल हॉटेल जवळ डोंगरावरील दरड रस्त्यावर येऊन काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य धोका टाळला आहे.

महाडजवळील नीलकमल हॉटेलजवळ असणारे डोंगर फोडून सुमारे वर्षभरापूर्वी या महामार्गाच्या कामाचे रुंदीकरण एल अँड टी कंपनीने केले. मात्र ज्या पद्धतीने कंपनीने हा डोंगर फोडला, त्या पद्धतीने या डोंगरावरील दरड भविष्यात महामार्गावर येऊन अपघात होण्याची शक्यता स्थानिक ग्रामस्थांकडून वर्तवली जात होती. मात्र, कंपनीने या कामाकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. अखेर दुसऱ्या वर्षी त्याचा प्रत्यय महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना आला आहे.

कोकणात पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. आज दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर वाढला असताना सायंकाळच्या सुमारास महामार्गावरील दरड कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कोकणात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रात्री – अपरात्री या डोंगरावरील दरड कधीही खाली येण्याची शक्यता स्थानिक ग्रामस्थांकडून वर्तवली जात आहे. मात्र स्थानिक ग्रामस्थांचे कोणतेही म्हणणे विचारात घ्यायचे नाही, केवळ आपल्या मर्जीने निकृष्ट दर्जाचे काम करायचे, याचा फटका महामार्गावरील जाणाऱ्या प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतो.

एकंदरीत एल अँड टी कंपनीने राष्ट्रीय महामार्गावर केलेल्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. मात्र, याकडे महाड येथील राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी डोळ्यावर काळीपट्टी बांधून गप्प बसले आहेत. या महामार्ग अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या कामाचा फटका या महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना बसत आहे.

कोकणात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण मुसळधार स्वरूपाचे असते. याचा अनुभव महाड येथील राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या कार्यालयात असणाऱ्या अधिकारी वर्गांना नसल्याने तसेच त्यांचे कोणतेही नियंत्रण एल अँड टी कंपनी करीत असलेल्या कामावर नसल्याने एल अँड टी कंपनीने मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाच्या कामाचा धडाका लावल्याचे चित्र मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महाडपासून पोलादपूर पर्यंत पाहण्यास मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here