रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर घाटातील वाहतुकीचे भवितव्य ठरणार!

Twitter: @maharashtracity

महाड (मिलिंद माने): पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटामध्ये मागील काही वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच दरड कोसळल्याची घटना झाल्यानंतर रातोरात घटनास्थळी पोहचून पोलीस, सार्वजनिक बांधकाम व महसूल प्रशासनाने पाहणी केली. सातारा जिल्ह्याला जोडणारा महाबळेश्वर आंबेनळी घाट वाहतुकीस धोकादायक असल्याने बंद केला. मात्र, सतत पडणाऱ्या पावसामुळे मागील दोन दिवसात दिवसा व रात्री आलेली दरड व मातीचा ढिगारा सार्वजनिक बांधकाम विभागाने हटविला असला तरी रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे शुक्रवारी एक जुलै रोजी या घाटाची पाहणी करणार असून त्यानंतरच हा घाट पावसाळ्यात वाहतुकीसाठी चालू ठेवायचा की नाही याबाबत अंतिम निर्णय होणार आहे. 

रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपूर तालुक्यात पावसाने जोरदार मुसंडी मारली असताना सातारा जिल्ह्याला जोडणारा महाबळेश्वर – आंबेनळी घाटात मागील दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणावर दरड व मातीचा ढिगारा डोंगरावरून खाली येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे व जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी आंबेनळी घाटातून जाणारी अवजड वाहतूक बंद करून ती तामिनी घाट व चिपळूणमार्गे वळवली आहे, असे असले तरी हलक्या वाहनांची वाहतूक मात्र या रस्त्यावरून चालू आहे. 

पोलादपूर येथील आंबेनळी घाटात आलेली दरड व मातीचा ढिगारा काढण्याचे काम दिवसभरात जेसीबी लावून मोकळा करण्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्परता दाखविली. तरी या रस्त्यावर कालिका माता मंदिराजवळ पडलेल्या दरडीमुळे रस्त्याला भेग पडली असून हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत खरी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे हे एक जुलै रोजी महाड, माणगाव व पोलादपूर तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात आढावा घेणार असून त्यादरम्यान धोकादायक असणाऱ्या आंबेनळी घाटाची पाहणी देखील करणार आहेत. त्यांच्या पाहणीनंतरच या घाटातील अवजड वाहतूक व अन्य हलक्या वाहनांची वाहतूक पावसाळ्यात चालू ठेवावी की नाही यावर शिक्कामोर्तब होणार आहे. 

पोलादपूर तालुक्याच्या सातारा जिल्हा हद्दीच्या शेवटच्या 1 ते 2 कि.मी.अंतरावरील हद्दीमध्ये कालिकामाता मंदिर असून या परिसरातील डोंगरमाथा सरळसोड आणि स्तरीत खडकाचा असून या जवळून जाणारा रस्ता संपल्यानंतर मोठी दरी आहे. या ठिकाणी इंग्रजांनी फिट्झगेराल्ड म्हणजेच आंबेनळी घाट बांधल्यापासून आजतागायत कधीही दरड कोसळण्याची घटना झाली नव्हती. मात्र, मंगळवारी रात्री दरड कोसळण्याची घटना झाल्यानंतर या ठिकाणी दरड कोसळून रस्त्याला देखील भेगा पडल्याचे दिसून आल्याने स्तरीत खडकावरून तयार झालेल्या या रस्त्याला निर्माण झालेला धोका स्पष्ट झाला आहे.

पोलादपूरजवळील आंबेनळी घाटात 28 जून रोजी पहाटेच्या सुमारास आंबेनळी घाटाच्या कालिका मंदिराजवळील दरड प्रवण क्षेत्रामध्ये जेसीबी पाठवून दरडी हटविण्याकामी पोलादपूर बांधकाम उपविभागातर्फे प्रयत्न सुरू झाले. यावेळी दरड हटविल्यानंतर आंबेनळी घाटरस्त्याला साधारणपणे दीड ते पाच इंच रूंदीच्या मोठ-मोठया भेगा पडल्याचे दिसून आले. या भेगांमध्ये पावसाचे पाणी शिरून भेगा रूंदावल्यास याठिकाणचा अर्धाअधिक घाटरस्ता दरीत कोसळण्याची शक्यता दिसून आल्याने दरडी हटविल्यानंतर या ठिकाणी डांबर ओतून भेगा बुजविण्यात आल्या.

यानंतर या ठिकाणाहून वाहतूक सुरू करण्यात आल्याची माहिती पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक युवराज म्हसकर यांनी दिली.

कोट्यावधी रुपयांचा खर्च पाण्यात जातो वाहून!

पोलादपूर तालुक्यात सन 2021 च्या अतिवृष्टीमध्ये दरड कोसळण्याच्या विक्रमी घटनांनंतर दरड हटविण्याकामी पोलादपूर – महाबळेश्वर आंबेनळी घाटावर तब्बल 59 कोटी रूपयांचा खर्च सार्वजनिक बांधकाम उपविभागाने केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आला. यानंतर या ठिकाणी केलेला खर्च केवळ ठेकेदारांच्या हितासाठी होता का? असा प्रश्न पोलादपूरसह सातारा जिल्ह्यातील जनता सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारत आहे. पोलादपूर – महाबळेश्वर – आंबेनळी घाटात आता यंदा केवळ चार-पाच दिवसांच्या पावसानंतर लगेचच दरडी कोसळण्याच्या घटनांची सुरूवात झाली आहे.

पोलादपूर – महाबळेश्वर – वाई – सुरूर हा रस्ता साधारणपणे 22 कि.मी.पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अखत्यारीत असून सन 2021 मध्ये महसूल यंत्रणेसह सार्वजनिक बांधकाम विभागाला महाबळेश्वरच्या हद्दीतही काम करावे लागले होते. मात्र, पोलादपूर तालुक्यातील विक्रमी दरडी कोसळण्याच्या घटनांबाबत विनासायास ठेकेदाराच्या मर्जीतील शाखा अभियंता व उपविभागीय अभियंता यांनी करोडो रुपयांची बोगस कामे करून सगळ्यांनी आपापले खिसे भरले आहेत. या ठेकेदारांवर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश नामदे तत्कालीन उपविभागीय अभियंता विजय बागुल यांनी ठेकेदारावर मेहेरबान होऊन बोगस कामांची बिल अदा करण्यात पुढाकार घेतला होता. 

पोलादपूर – आंबेनळी घाटातील दरड प्रवण क्षेत्रात झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या कामांचे स्ट्रक्चरल ऑडिट सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय पातळीवर करणार आहे का? की येरे माझ्या मागल्या? मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील दरड काढण्याच्या कामाचे सोपस्कार पार पाडून पोलादपूर उपविभागाचे शाखा अभियंता व कार्यकारी अभियंता महेश नामदे हे हे ठेकेदाराला मोकळे रान देणार का? या घाटात झालेल्या संरक्षक भिंतीच्या कामाची स्ट्रक्चरल ऑडिट केल्यास या सर्व भिंतींच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर दगड, गोटा व डबर टाकून या संरक्षक भिंतीची कामे करण्यात आल्याचे स्थानिक जनतेकडून सांगण्यात येत आहे.  मात्र, दक्षता व गुण नियंत्रण विभागाचे अधिकारी देखील या ठेकेदारांना मॅनेज झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांकडूनच सांगण्यात येत आहे. 

ज्याप्रमाणे रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी पोलादपूर आंबेनळी घाटाच्या कामाची पाहणी दौरा आयोजित केला आहे, तसा पाहणी दौरा राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव व दक्षता गुणनियंत्रण विभागाचे अधीक्षक अभियंता करणार काय़ हाच खरा प्रश्न यानिमित्ताने उभा राहत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here