X: @milindmane70
महाड: ऐतिहासिक महाड शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि जोड रस्त्यांवर अनेक जीवघेणे खड्डे पडले आहेत. हे खड्डे पावसाळ्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात भरले गेले होते. मात्र अवघ्या दोनच आठवड्यात या खड्ड्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. पावसाळा उलटून गेला तरी देखील वाहन चालकांना खड्ड्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. हे खड्डे भरले जावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.
खड्डेमुक्त रस्त्यांची महाडकर नागरिकांना प्रतीक्षा आहे. मात्र नगरपालिका प्रशासन डोळ्यावर काळी पट्टी याकडे दुर्लक्ष करत आहेत. कोकणातील मुंबई – गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या महाड शहराला ऐतिहासिक महत्व आहे. शहराचा कारभार मागील वर्षभरापासून प्रशासक हाताळत आहेत. नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहराच्या प्रमुख आणि जोड रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप नागरिक करतात.
शहरातील मुख्य रस्ते आणि जोड रस्त्यांचे काँक्रीटीकरण झालेले असले तरी देखभाल- दुरुस्ती न झाल्याने या रस्त्यांवर जीवघेणे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी नळ जोडणीसाठी खोदलेले खड्डे जैसे थे आहेत. नगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता मनाला वाटेल तसा प्रत्येक जण मुख्य रस्ते, जोड रस्त्यावर रात्रीच्या सुमारास नळ जोडण्यासाठी रस्ते खणून नळ पाईप टाकण्याचा उपद्व्याप करीत आहेत.
महाड शहरात प्रवेश करण्यासाठी केंबूर्ली, चांभार खिंड, शेडाव नाका, नाते खिंड, दादली पूल येथून रस्ते आहेत. यातील केंबूर्ली येथून गांधारी पुलाजवळ असलेला रस्ता यापूर्वी जिल्हा परिषदेच्या ताब्यात होता. आता हा रस्ता महाड नगरपालिकेकडे हस्तांतर झाला आहे. असे असले तरी आजतागायत या रस्त्यावर दुरुस्ती झालेली नाही. यामुळे केंबुर्लीपासून गांधारी पुलापर्यंत प्रचंड खड्डे पडले आहेत.
यापैकी नातेखिंड ते दस्तुरी नाका आणि शेडाव नाका ते नवे नगर हे दोन रस्ते सुस्थितीत आहेत. शहरामध्ये असलेल्या छ. शिवाजी मार्ग, महात्मा गांधी मार्ग, मुख्य बाजारपेठ, छ. शिवाजी चौक ते दादली पुल, दादली पुल ते गवळ आळी, दादली पूल ते वीरेश्वर मंदिर पर्यंतच्या रस्त्यावर शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय व स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता आहे. शासकीय विश्रामगृह, वीरेश्वर मंदिर अशी ऐतिहासिक स्थळे असताना या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत.
या खड्ड्यातून शाळेतील व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व रुग्णवाहिकेच्या रुग्णांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. कोटेश्वरी ते पंचायत समिती, काकर तळे मोहल्ला ते भिलारे मैदान, आदी रस्त्यांवर पडलेले खड्डे गेली अनेक महिने भरले गेलेले नसल्याने वाहन चालकांना तसेच दुचाकीस्वारांना त्रास सहन करावा लागत आहे.
छ. शिवाजी महाराज चौक येथे नगरपालिका इमारतीसमोरच रस्त्याला खड्डे पडले आहेत. हीच स्थिती छ. शिवाजी महाराज चौक ते दस्तुरी नाका तसेच दस्तुरी नाक्यापासून डॉ. म्हामनकर हॉस्पिटल इथपर्यंत काँक्रिट रस्त्यातील लोखंडी रॉड बाहेर आले आहेत. गेले कित्येक महिने महाडमधील नागरीक खड्डे भरण्याबाबत वारंवार मागणी करत आहेत.
नगरपालिकेच्या प्रशासनाला खड्डे भरण्याकरता मुहूर्त मिळत नसल्याची चर्चा नगरपालिकेचे कर्मचारी, आजी-माजी नगरसेवक, भाजी विक्रेते तसेच प्रतिष्ठित नागरिकांमध्ये ऐकण्यास येत आहे. नगरपालिकेकडून खड्डे भरण्यासाठी आणि नवीन रस्त्यांसाठी प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. मात्र या प्रस्तावाच्या मंजुरीला मुहूर्त कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एसटी स्टँड ते नवे नगर, शेडाव रस्ता ते राष्ट्रीय महामार्गपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता करणे, सर्वे नंबर ६६ ते सर्वे नंबर ७१ पर्यंत नवीन काँक्रीट रस्ता, सर्वे नंबर ८६ ते सर्वे नंबर ७१ पर्यंत नवीन काँक्रीट रस्ता, दस्तुरी नाका ते राष्ट्रीय महामार्ग काँक्रीट रस्ता व नाला बांधकाम, दस्तुरी नाका ते राष्ट्रीय महामार्ग काँक्रिटीकरण, मारुती मंदिर ते सर्वे नंबर १०१ मारुती मंदिर ते राष्ट्रीय महामार्ग, दस्तुरी नाका ते लोकमान्य हनुमान व्यायाम शाळा, कोटेश्वरी तळे पूर्व बाजू सर्वे नंबर ९७ ते दक्षिण बाजू नवीन पर्यंत काँक्रिटीकरण, कोटेश्वरी तळे सर्वे नंबर १०० ते दक्षिण बाजूपर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण, सर्वे नंबर ९४ ते सर्वे नंबर ७५ सर्वे नंबर ५४ ते सर्वे नंबर ७३ पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता, शेडाव नाका ते सर्वे नंबर ८५ नवीन सिमेंट काँक्रीट रस्ता हनुमान व्यायाम शाळा ते एसटी स्टँड हनुमान व्यायाम शाळा ते एसटी स्टँड अशा रस्त्यांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत.
शहरातील अनेक रस्ते रुंदीकरणाची गरज!
शहराची लोकसंख्या, इमारतींची संख्या, वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पूर्वीच्या शहर रचना नकाशाप्रमाणे आता रस्ते अरुंद पडत आहेत. त्यातच रस्त्यांवर होणाऱ्या अतिक्रमित विक्रेत्यांची गर्दी, यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे शिवाजी चौक ते चवदार तळे, शिवाजी चौक ते दादली पुलापर्यंतचा रस्ता, शिवाजी चौक ते एसटी बस स्थानक, काकरतळेपासून महामार्गाकडे जाणारा रस्ता, अशा अनेक रस्त्यांचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे. शहरातील छत्रपती शिवाजी मार्ग तसेच महात्मा गांधी मार्ग या दोन मार्गांवर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. यामुळे या दोन्ही रस्त्यांचे दुभाजकांसह रुंदीकरण होणे काळाची गरज आहे.