ठेकेदाराचा हलगर्जीपणा प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता?

X : @milindmane70

महाड

रायगड जिल्ह्यातील महाड (Mahad) तालुक्यातील म्हाप्रळ – पंढरपूर मार्गावरील वरंधा घाट (Varandha Ghat) केवळ कागदोपत्री बंद आहे. प्रत्यक्षात आजही खुलेआमपणे वाहतूक सुरू आहे. यामुळे पावसाळ्यापूर्वीच वरंधा घाट धोकादायक बनला आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ठिकठिकाणी धोकादायक स्थिती असून हा हलगर्जीपणा प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या असंख्य वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.

महाड तालुक्यातून जाणारा व पुणे (Pune) जिल्ह्याला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. म्हाप्रळ – पंढरपूर मार्ग हा पुणे जिल्ह्याला जोडणारा जवळचा मार्ग असल्याने गेल्या अनेक वर्षापासून या मार्गावरून वाहतूक सुरू आहे. हा घाट अरुंद असल्याने यापूर्वी अनेक अपघात देखील झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) ताब्यातील या रस्त्याचे आता राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या (National Highway) माध्यमातून रुंदीकरण केले जात आहे. या रुंदीकरणासाठी करोडो रुपये मंजूर झाले आहेत. मात्र गेल्या दोन वर्षापासून म्हाप्रळपासून सुरू असलेल्या रुंदीकरणाचे काम अत्यंत घिम्या गतीने सुरू असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

सन २०२१ च्या अतिवृष्टीमध्ये माझेरी, पारमाची यादरम्यान हा घाट जागोजागी खचला होता, तर अनेक ठिकाणी भूस्खलन (landslide) झाल्याने रस्ता तब्बल आठ महिने बंद होता. त्यानंतर करोडो रुपये खर्च करून संरक्षक भिंती उभारून हा मार्ग सुरू करण्यात आला. सद्यस्थितीत वाघजाईपासून ढालकाटीपर्यंत जागोजागी मातीचा भराव, संरक्षक भिंत उभी करण्यासाठी केलेले खोदकाम आणि छोट्या-मोठ्या आलेल्या दरडी आजही तशाच असल्याने घाटामध्ये धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे.

रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे (Raigad Collector Kisan Jawale) यांनी एक महिन्यापूर्वी रस्त्याच्या कामाकरता हा घाट बंद राहील, असा आदेश काढला होता. प्रत्यक्षात आजही घाट सुरूच आहे. रस्त्यात टाकलेल्या दगडी मातीचा भराव बाजूला करून वाहन चालक घाटातून मार्ग काढत प्रवास करत आहेत. मे महिन्याच्या काळात आणि पावसाळ्याच्या तोंडावर घाटामध्ये ठीक ठिकाणी संबंधित ठेकेदाराकडून खोदकाम करून संथ गतीने काम सुरू आहे. घाटात केलेला खोदकामामुळे पावसाळ्याच्या काळात दगडी किंवा मातीचा भराव रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. वरंधा घाट बंद करण्याच्या हेतूने रस्त्यामध्ये मोठ्या दगडी ठेवण्यात आलेल्या आहेत, मात्र या दरडी तात्पुरत्या स्वरूपात बाजूला केल्या गेल्या आहेत. घाटामध्ये पसरणाऱ्या धुक्यामधून या दरडी दिसल्या नाहीत तर अपघात होण्याची शक्यता आहे. यामुळे घाटातून वाहनांना प्रवास करण्यास हा मार्ग बंद करणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे लक्ष आहे कुठे ?

महाडमधील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांकडून महाड तालुक्यात सुरू असलेल्या रस्त्यांच्या बाबतीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. तालुक्यातील किल्ले रायगड मार्ग, म्हाप्रळ – पंढरपूर रस्ता त्याचप्रमाणे अंबडवे हे तिन्ही रस्ते आजही अर्धवट अवस्थेत आहेत. या रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य असल्याने पाऊस पडल्यानंतर वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. ठिकठिकाणी रस्ते अर्धवट ठेवण्यात आलेले आहेत, ज्या ठिकाणी रस्त्याची अर्धवट अवस्थेत काम आहेत, त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे दिशादर्शक फलक अथवा धोकादायक रस्ता आहे असे कोणतेही फलक लावले नसल्याने वाहन चालकांना रात्रीच्या वेळेस रस्ता कळत नाही. त्यामुळे रात्रीच्या सुमारास अनेक अपघात घडत आहे.

अशाच पद्धतीने म्हाप्रळ – भोर – पंढरपूर या रस्त्यावर धोकादायक स्थिती आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारी कार्यालयातील थंडगार एसी मध्ये बसण्यात व वातानुकूलित यंत्रणेमध्ये बसून डबा खाऊन वामकुशी घेण्यात धन्यता मानत आहेत. कागदोपत्री हा घाट बंद असला तरी प्रत्यक्षात वाहनांची ये-जा सुरूच आहे, यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो.

अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

महाडच्या राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे वरंधा घाटामध्ये अपघात झाल्यास राज्य सरकार व रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारासहित राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य उदाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या असंख्य वाहन चालकांकडून होत असून याबाबत लवकरच सामाजिक संघटना राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करणारा असल्याचे समजते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here