दुर्मिळ प्राणी बनत आहेत वेगवान वाहनांची शिकार
Twitter : @maharashtracity
महाड: फेब्रुवारी महिन्यापासून पाणीटंचाई चालू झाल्यापासून संपूर्ण रायगड जिल्ह्यातील वातावरणात प्रचंड बदल झाला आहे. तापमान जवळपास ४5 अंशाच्या वर जाऊन पोहोचले आहे. यामुळे कडाक्याच्या उन्हात जनतेला बाहेर पडणे मुश्किल बनले आहे. त्यातच जंगलात लागणारे वणव्यामुळे वाढणारे तापमान व पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने माणसांसह पशु – पक्षी देखील व्याकुळ झाले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या शोधात असलेले वन्य जीव यामुळे आपला जीव गमावून बसत असल्याचे चित्र संपूर्ण रायगड जिल्ह्यासह महामार्ग व राज्य मार्गावर दिसत आहे.
महाडसह संपूर्ण कोकणामध्ये तापमानामध्ये वाढता उष्मा डोकेदुखी बनत चालली आहे. वातावरणातील बदलामुळे संपूर्ण कोकणातील तापमान आता 45° अंश सेल्सिअसहुन अधिक गेलेले दिसून येत आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्यादेखील मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे. विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. एकीकडे माणूस पिण्याच्या पाण्याच्या शोधात वणवण करत असताना दुसरीकडे जंगलातील वन्य प्राणी देखील पिण्याच्या पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळत आहेत. जंगलातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत कडाक्याच्या उन्हाळ्यात पूर्णपणे आटून गेले आहेत, यामुळे वन्य प्राणी आणि पशुपक्ष्यांचे मोठे हाल होताना दिसत आहेत.
वन विभागाकडून वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत पुन्हा कार्यान्वित करणे आदी उपक्रम फक्त कागदावर होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे वन्य प्राणी मानवी वस्ती आणि धरण क्षेत्रामध्ये पिण्याच्या पाण्याच्या शोधात येत आहेत. अनेक वेळा या प्राण्यांना वर्दळीचा रस्ता ओलांडत यावे लागत असल्याने अनेक दुर्मिळ प्राणी वेगवान वाहनांचे बळी ठरत आहेत. महाड तालुक्यात मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गवरील केबुर्ली गावाजवळ अशाच पद्धतीने एका बिबट्याला उडवल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. गेली महिनाभरात महाड – विन्हेरे- खेड या पर्यायी मार्गावर कुरले घाटात मधल्या काळात कस्तुरी मांजर आणि रान मांजर हे दुर्मिळ प्राणीरस्त्यावर वाहनांच्या धडकेने मृत पावलेले आढळले. याच मार्गावर कांही महिन्यापूर्वी रस्त्यालगत एक रानडुक्कर वाहनाच्या धडकेने मृत अवस्थेत आढळून आला होता. यातील ससे, साळींदर, असे लहान प्राणी वाहनचालक शक्यतो वाहनांची धडक बसताच उचलून घेऊन जात असल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.
जंगलातील नष्ट होत चाललेल्या वन्यजीव व पशुपक्ष्यांच्या जाती तसेच दुर्मिळ प्राणी रस्ता ओलांडत असताना वाहन चालकांनी वाहनाचा वेग मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. मात्र वेगाने वाहन चालविणारे मुंबई व पुण्यातील असंख्य वाहन चालकांना जंगलातील जाणाऱ्या रस्त्यांचा व त्या ठिकाणी वावर असणाऱ्या प्राण्यांचा व पशुपक्ष्यांचा अंदाज येत नसल्याने व वेगवान वाहनांच्या गतीमुळे या दुर्मिळ प्राण्यांचा मृत्यू होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
कोकण रेल्वेच्या कुंभार्डे, शिरसवणे व फाळकेवाडी बोगद्यांमध्ये अनेक ठिकाणी दगडातून पाझरणाऱ्या पाण्यामुळे पाणवठे तयार झाले आहेत. त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस वन्य प्राणी व पशुपक्षी पाणी पिण्यास येतात. वन्य प्राणी या बोगद्यात शिरतात. मात्र एखादी रेल्वे आल्यास या वन्य प्राण्यांना बाहेर पडणं शक्य होत नाही. त्यामुळे रेल्वेची धडक बसून हे वन्य प्राणी मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना घडत आहेत. हे वन्य प्राणी पिण्याच्या पाण्याच्या शोधात साधारण रात्रीच्या वेळेस बाहेर पडतात. त्यामुळे रात्रीच्या सुमारास वाहन चालकांनी जंगल भागातून प्रवास करत असताना वन्यप्राणी गाडीच्या चाकाखाली येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे मत प्राणी मित्रांनी व्यक्त केले आहे.