मुंबई, दि. 31 (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी कॉंग्रेसला मुरबाड तालुक्यात खिंडार पडले असून, ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुभाष पवार यांनी हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनाभवनात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रवेश देत `ज्या कारणासाठी आपण एकत्र येत आहोत, ते कारण पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या. तर शिवसेनेचे नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे पवार यांनी जाहीर केले.

या वेळी ठाण्याचे पालकमंत्री व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, शिवसेनेचे सचिव व खासदार अनिल देसाई, राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, आमदार रुपेश म्हात्रे, शांताराम मोरे, माजी आमदार पांडूरंग बरोरा आदी उपस्थित होते. सुभाष पवार यांच्याबरोबरच जिल्हा परिषदेच्या कृषी व पशूसंवर्धन समितीचे सभापती किशोर जाधव, समाजकल्याण समितीच्या सभापती संगीता गांगड, भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इरफान भुरे, मुरबाड बाजार समितीचे सभापती चंद्रकांत बोष्टे, जिल्हा परिषदेचे सदस्य प्राजक्ता भावार्थे, दिपाली झुगरे, किसन गिरा, निखिल पांडूरंग बरोरा, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुरबाड तालुकाध्यक्ष रामभाऊ दळवी, कल्याण तालुकाध्यक्ष चंद्रकांत गायकर, रवींद्र टेंबे आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

मुरबाडची चार टर्म आमदारकी भूषविलेल्या गोटीराम पवार यांचे सुभाष हे पुत्र आहेत. सुभाष पवार यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यात मोठे जाळे तयार केले आहे. गोटीराम पवार यांनी २००९ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर पडून अपक्ष उमेदवार निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी तब्बल ५० हजार मते मिळविली होती. मात्र, त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतरच्या निवडणुकीतही मुरबाड विधानसभा मतदारसंघातून मुरबाड तालुक्यातून त्यांनी आघाडी मिळाली होती.

मुरबाड तालुक्यात गोटीराम पवारांना मानणारा मोठा वर्ग असून, तो आता शिवसेनेच्या मागे आल्याने शिवसेनेची ताकद मजबूत झाली आहे. 
ठाणे जिल्हा परिषदेत पावणेदोन वर्षांपासून शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी आहे. त्यात सुभाष पवार यांनी उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. यापूर्वी पवार यांनी मुरबाड पंचायत समितीचे सभापतीपद भूषविले होते. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे ते संचालक आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत. मुरबाड तालुक्यात सुभाषदादा पवार मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांचे हजारो समर्थक आहेत. जनसेवा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून मुरबाड तालुक्यात शैक्षणिक जाळे निर्माण करण्यात आले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here