परभणी: महाराष्ट्र हे इतिहास घडवणारे राज्य आहे त्यामुळे राज्यातील तरुणाईच्या जोरावर आम्ही पुन्हा स्वराज्य स्थापन केल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी परभणी येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिकला आले म्हणून सर्व विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. बाजारपेठेत कांदा आणू दिला नाही. अधिकाऱ्यांना विचारले तर पाकिस्तानहून कांदा आणला आहे याचा लोकांच्या मनात रोष आहे. पंतप्रधान यांच्या गाडीवर कांदे फेकतील अशी भीती आहे म्हणून कांद्यावर बंदी आणली असेही शरद पवार म्हणाले.

तुम्ही बाहेरून कांदा आणणार… शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव देणार नाही, त्याला कर्जबाजारी करणार, त्याला आत्महत्या करायला भाग पाडणार मग हे आपण सहन करायचे का ? ज्याच्या मनगटात धमक असेल, स्वाभिमान असेल तर तो सहन करणार नाही असा जबरदस्त आत्मविश्वास शरद पवार यांनी जनतेच्या मनात जागृत केला.

आज प्रचंड अडचणीचा काळ आहे. रिझर्व्ह बँकेच्या प्रमुखांनी सांगितले की, देश आर्थिक संकटात आहे. कारखाने उद्ध्वस्त झाले आहेत. लोकांचे रोजगार गेले आहेत. देश मोठ्या संकटात सापडला आहे. ही परिस्थिती कोणी निर्माण केली तर आजच्या राज्यकर्त्यांनी असा थेट आरोपही शरद पवार यांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत सत्तेत आले आणि अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक करणार असे जाहीर केले. परंतु आज जाऊन बघा झालंय का स्मारक ? नाव छत्रपतींचे आणि आपले धंदे चालवतात असा आरोपही शरद पवार यांनी सरकारवर केला.

छत्रपतींचे वंशज सत्ताधारी पक्षात गेले.दिल्लीश्वरांसमोर जाऊन झुकले.छत्रपती शिवाजी महाराजांना दिल्लीला बोलावले होते आणि दरबारात मागे बसवले. हा अपमान महाराजांनी सहन केला नाही. महाराज ताडकन उठले माघारी परतले आणि पुन्हा सारे गडकिल्ले जिंकून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. ही महाराष्ट्राची अस्मिता आहे याची आठवण शरद पवार यांनी यावेळी करुन दिली.

काही दिवसात निवडणूक जाहीर होईल. जेव्हा जाहीर व्हायची तेव्हा होऊ द्या आपण लढा द्यायचा आहे. काही जण म्हणतात सत्ताधारी पक्षाकडे संपत्तीचा डोंगर आहे. त्यांच्याकडे संपत्तीचा डोंगर असेल तर माझ्याकडे तरुणाईचा समुद्र आहे असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here