@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेच्या (BMC) तीन प्रमुख रुग्णालयांपैकी एक असलेल्या सायन रुग्णालयात (Sion Hospital) रुग्णांसाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे या रुग्णालयाचा विस्तार करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. त्यासाठी पालिका या कामासाठी सल्लागारावर १० कोटी रुपये खर्च करणार आहे.

यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

वास्तविक, पालिकेने विकास कामांसाठी बाहेरील सल्लागार (Consultant) नेमून त्यावर खर्च करण्यापेक्षा पालिकेतील अनुभवी अधिकाऱ्यांची सल्लागार म्हणून नेमणूक करून त्याचा वापर करण्यात यावा, अशी सूचना शिवसेनेच्या (Shiv Sena) एका नगरसेवकाने केली होती. त्यामुळे आता सत्ताधारी शिवसेना या प्रस्तावाला विरोध करणार की त्यास समर्थन देणार हे बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत स्पष्ट होणार आहे.

६० वर्षे जुन्या व ६८,५१३ चौ. मिटर क्षेत्रफळ असलेल्या सायन रुग्णालयात मुंबईतील व मुंबईबाहेरील विविध आजारांनी त्रस्त रुग्ण उपचारासाठी दररोज येत असतात. या रुग्णांची वाढती संख्या पाहता पालिकेला या रुग्णालयाची क्षमता वाढविण्याची आवश्यकता भासली.

त्यामुळे आता या रुग्णालयाच्या विस्ताराचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी पालिकेने मे. शशांक मेहंदळे अँड असोसिएट्स यांना सल्लागार म्हणून नेमले असून त्यासाठी त्यांना १० कोटी २६ लाख रुपये देण्यात येणार आहेत. मेहंदळे यांनी त्यांच्या कामाच्या अंतर्गत आणखीन दोन सल्लागार काम करणार असून त्यांची जबाबदारी मे. मेहंदळे यांची असणार आहे.

रुग्णालय विस्ताराचे काम हे चार टप्प्यात व पुढील आठ वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here