चार महिन्यांत ‘सँडहर्स्ट रोड’ रेल्वेमार्गाखाली नवीन पर्जन्य जलवाहिनी
महापालिका आणि मध्य रेल्वेचे संयुक्त अभियांत्रिकीय प्रयत्नांना यश

@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेच्या (BMC) आणि मध्य रेल्वेच्या (Central Railway) अभियंत्यांनी संयुक्तपणे केलेल्या कौशल्यपूर्ण अभियांत्रिकीय कामांमुळे यंदाच्या पावसाळ्यातील अतिवृष्टी दरम्यान सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानक परिसर पाणी न साचल्याने पुरमुक्त झाला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचल्याने होणाऱ्या त्रासापासून मोठा दिलासा मिळाला आहे.

‘सँडहर्स्ट रोड’ रेल्वे ट्रॅकच्या खालून तब्बल ४१५ मीटर लांबीची आणि १,८०० मिलिमीटर व्यासाची नवीन पर्जन्य जलवाहिनी मध्य रेल्वेद्वारे टाकण्यात आली. तर ही पर्जन्यजल वाहिनी महापालिकेच्या मुख्य पर्जन्य जलवाहिनीला जोडण्यासाठी रेल्वे हद्दीच्या पुढील भागात २५ मीटर लांबीची एक अतिरिक्त ‘बॉक्स ड्रेन’ महानगरपालिकेच्या वतीने टाकण्यात आली आहे.

‘बाॅक्स ड्रेन’ बांधण्यात आलेल्या ठिकाणी असणाऱ्या टाटा कंपनीच्या अतिउच्च दाब क्षमतेच्या विद्युत वाहिन्या आणि मोठ्या जलवाहिन्या यामुळे हे कार्य अत्यंत आव्हानात्मक होते. मात्र रेल्वे व पालिकेच्या अभियंत्यांनी हे काम अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने अवघ्या चार महिन्यात पूर्ण केले आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली आहे.

मुंबईमध्ये उपनगरीय रेल्वे रुळांवरील पावसाळी पाणी साचण्याच्या ठिकाणी मायक्रो टनेलिंगचे काम रेल्वे हद्दीत रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे. दक्षिण मुंबईतील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकानजीकच्या परिसरात दर वर्षी अतिवृष्टी दरम्यान पाणी साचून रेल्वे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असे.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या अभियंत्यांनी व मध्य रेल्वेच्या अभियंत्यांनी संयुक्तपणे अभ्यास करून, फक्त नाल्यांवर अवलंबून न राहता, ‘रेल्वे ट्रॅक’च्या खाली ‘मायक्रो टनेलिंग’ पद्धतीने रेल्वे हद्दीतील पर्जन्य जलवाहिनी तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी नवीन मार्ग खुला झाला, अशी माहिती श्री. वेलरासू
यांनी दिली.

पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (CM IS Chahal) आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू ह्यांच्या निर्देशानुसार, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) राजन तळकर यांच्यासह पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे प्रमुख अभियंता कमलापुरकर, उप प्रमुख अभियंता विवेक राही, कार्यकारी अभियंता युवराज राऊत, दुय्यम अभियंता स्नेहल जाधव आणि श्रीकांत गोधडे यांनी हे काम पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

तर, रेल्वे प्रशासनाच्यावतीने सीनिअर डिविजनल इंजिनिअर (दक्षिण) अर्पण कुमार, असिस्टंट डिविजनल इंजिनिअर (भायखळा) मनीष सिंग, सीनिअर सेक्शन इंजिनिअर (भायखळा) अरुण कुमार, सीनिअर सेक्शन इंजिनिअर (भायखळा) निशांत कुमार सिंग, सीनिअर सेक्शन इंजिनिअर (परळ) संजय पारधी, सीनिअर सेक्शन इंजिनिअर (सीएसएमटी) मोहम्मद एजाज आलम, कार्य प्रभारी (भायखळा) तरूण कुमार या अभियांत्रिकी पथकाने यात योगदान दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here