Twitter :@maharashtracity
मुंबई
औरंगजेब हा या देशातील कुणाचाही नेता किंवा आदर्श होऊच शकत नाही. तो मंगोल वंशीय होता, भारतातील मुस्लिमांचा देखील औरंगजेब नेता होऊ शकत नाही, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, अब्दुल कलाम ही या देशातील महान व्यक्तीमत्व आपले आदर्श असू शकतात, असे स्पष्ट प्रतिपादन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान सभेत लक्षवेधीला उत्तर देताना केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनीही त्या औरंगजेबाचे महिमा मंडन (उदात्तीकरण) करू नये, असे आवाहन फडणवीस यांनी लक्षवेधीला उत्तर देताना केले. यावेळी दोन्ही बाजूच्या सदस्यांनी शेरेबाजी केल्यामुळे सभागृहात गदारोळ झाला.
भाजप सदस्य नितेश राणे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. औरंगजेबाची प्रशंसापर स्टेटस, पसरविलेले मेसेज, लावलेली पोस्टर, परिणामी अनेक ठिकाणी हिंसक वातावरण, दंगली, विरोधात निघालेले मोर्चे यावरून झालेली कारवाई यांचा उल्लेख राणे यांनी केला. काही मुस्लिम तरुणांनी झळकवलेले औरंगजेबच्या पोस्टर्सबाबत तातडीने कारवाई करा,अशी मागणी त्यांनी केली. या दरम्यान राणे आणि समाजवादी पार्टीचे सदस्य अबू असीम आझमी यांच्यात शाब्दिक चकमक झाली, तुम्हाला औरंग्याचे एवढे प्रेम असेल तर इथे कशाला राहता? पाकिस्तानात निघून जा, असा शेरा नीतेश राणे यांनी मारल्याने सभागृहात काही वेळ गोंधळ झाला.
गृहमंत्री फडणवीस यांनी या लक्षवेधीला सविस्तर उत्तर देताना राज्यभरात औरंगजेब प्रशंसापर पोस्टर, स्टेटस, किंवा मेसेज पसरविणे तसेच लव्ह जिहाद, लॅन्ड जिहाद, धर्मांतराचे प्रयत्न, गोहत्या, तसेच सकल हिंदू समाज आणि हिंदू जन आक्रोश मोर्चे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यावरून ४८ आरोपींवर विविध ठिकाणी ३५ गुन्हे दाखल केले आहेत. पस्तीस जणांना अटक झाली आहे, अशी माहिती दिली.