@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेच्या (BMC) बाळासाहेब ठाकरे ट्रामा सेंटरमधील (Balasaheb Thackeray Trauma Centre) १०५ बहू उद्देशीय कर्मचारी गेले तीन महिने पगाराविना आहेत. कोरोना काळ कमी होऊ लागल्यावर पगाराला विलंब होऊ लागल्याचे कामगार सांगत आहेत. मात्र तीन महिन्याचा पगार दिला नसल्याचा मुद्दा ट्रामा सेंटरच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. नगरकर यांनी खोडून काढला.

सध्या कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. अशा वेळी पालिकेने काही रुग्णालये नॉन कोविड (non covid hospital) करण्यास सुरुवात केली आहेत. मात्र कोविड ड्युटीसाठी वापरण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोविड कमी होऊ लागल्यावर पगार ही विलंबाने देऊ लागले असल्याचे समोर येत आहे.

बाळासाहेब ठाकरे ट्रामा सेंटरमधील हे कामगार गेले आठ वर्षे काम करत आहेत. सध्या सुरु असलेल्या कोविड काळात या कामगारांनी रूग्ण सेवा केली. कोविड वॉर्ड पासून ऑपरेशन थिएटर पर्यंत कोणत्याही वॉर्डात बहू उद्देशीय कामगारांनी कर्तव्य बजावले. यावेळी काही जणांना कोरोना संसर्ग देखील झाला. कोणत्याही परिस्थितीत हे कामगार रूग्ण सेवा करत होते.

या महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णालय नॉन कोविड करण्यात आले आहे. मात्र गेल्या तीन महिन्यापासून या १०५ कामगारांना पगार दिला जात नसल्याचे कामगार सांगतात. कोरोना सारख्या संकट काळात जीवन जगण्याचा प्रश्न त्यांच्या समोर आहे. याबाबत रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी ते पालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांच्या सोबत पत्र व्यवहार करण्यात आला. मात्र अद्याप कोणीही यावर तोडगा काढू शकले नसल्याचे कामगार सांगतात.

कोरोना ओसरू लागल्यावर रुग्णालयातील कंत्राटी कामगारांकडे रुग्णालय प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. यातून बहउद्देशीय कामगारांना तीन महिने पगार न दिल्याने अन्याय होत असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

यावर बाळासाहेब ठाकरे ट्रामा सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नगरकर यांना विचारले असता त्यांनी हा मुद्दा खोडून काढला. सर्व कामगारांचा पगार देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र बहू उद्देशीय कोणत्याही कामगाराचा गेले तीन महिने पगार दिला नसून कोविड ड्युटी साठी घेतलेल्या विशेष ४० जणांचा ५ हजारच्या टप्प्यात दोन वेळा दिला असल्याची माहिती कामगारांनी दिली. त्यामुळे ट्रामा केअर सेंटर मधील बहू उद्देशीय कर्मचारी पगाराच्या प्रश्नावर अधिक चिंतीत झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here