@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेने शहर व उपनगरातील महिला बचतगटांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी व त्यांच्या सामाजिक गरजांच्या पुर्ततेसाठी पालिकेच्या सन २०२१ -२२ च्या अर्थसंकल्पात ३.२० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

मुंबई महापालिकेचे निकष पूर्ण करणाऱ्या पात्र महिला बचतगटांना पालिकेतर्फे प्रति सभासद २ हजार रुपये याप्रमाणे जास्तीत जास्त २५ हजार रुपयांचे भांडवल एकदाच देण्यात येणार आहे. त्यामुळे महिला बचतगटांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

मुंबई महापालिका महिला बचतगटांना सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी, त्यांना रोजगार मिळण्यासाठी भांडवल म्हणून ९०८ महिला बचतगटांना जेंडर बजेटअंतर्गत तब्बल ३.२० कोटी रुपये देणार आहे.

१८ वर्षांवरील १०-२० महिलांच्या बचतगटांना प्रति सभासद २ हजार रुपयेप्रमाणे २५ हजार रुपयांची आर्थिक मदत खेळते भांडवल म्हणून देण्यात येणार आहे. त्यामुळे आता मुंबईतील महिला बचतगटांना “अच्छे दिन”येणार आहे, असे म्हणायला हरकत नाही.

मुंबईतील महिला बचतगटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी त्यांच्या आर्थिक, सामाजिक गरजांच्या पूर्ततेसाठी मुंबई महापालिकेने अर्थसंकल्पात ३.२० कोटी रुपयांची तरतुद केली आहे.

या योजनेच्या अंतर्गत ज्या महिला बचतगटांतील केशरी/ पिवळ्या शिधापत्रकधारक महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखापर्यंत असेल व त्यांचे वय १८वर्षांपेक्षा जास्त असेल अशा महिलेला प्रत्येकी २ हजार रुपये प्रमाणे १०-२० महिलांच्या बचतगटांना २५ हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. त्यासाठी त्या महिलांचे राष्ट्रीय अथवा सारस्वत बँकेत खाते असणे आवश्यक आहे. त्यांच्या बँकेतील खात्याला किमान ३ महिन्यांचा कालावधी झालेला असला पाहिजे.

महिला बचतगटांतील सभासदांनी दरमहा १०० रुपये वर्गणी जमा करणे आवश्यक असणार आहे. बचतगट १ एप्रिल २०२१ पूर्वीचे असल्यास त्यांनी त्या बचतगटास यापूर्वी अर्थसाहाय्य झालेले नसल्याचे प्रमाणित करावे लागेल. तसेच या योजनेसाठी सदर महिला बचतगटांचे आर्थिक व्यवहार, इतर बाबी आणि मुल्यमापन केल्यानंतरच त्यांना पात्र ठरविण्यात येणार आहे.

त्यासाठी संबंधित महिला बचतगटांतील महिलेने तिचा फोटो, आधारकार्ड व अन्य पुरावे सादर करणे आवश्यक आहे. मात्र जर एखाद्या महिला बचतगटात काही आर्थिक घोटाळा झाल्याचे निदर्शनास आले तर त्या महिला बचतगटाला देण्यात आलेली आर्थिक मदत काढून घेण्यात येईल, असे पालिकेने या योजनेच्या अटी शर्तींमध्ये म्हटले आहे. एका बचतगटाला एकदाच अर्थपुरवठा केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here