@maharashtracity

मुंबई: मुंबईत पहाटेपासून तीन – चार तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे (heavy rain in Mumbai) रेल्वे, रस्ते सेवा विस्कळीत झाली. त्याचा मुंबईकर व मुंबई बाहेरून कामाला येणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना चांगलाच फटका बसला. प्रवाशांचे, महिलांचे हाल झाले.

मध्य व हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक काही तास ठप्प झाली होती. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत होती. पावसाचा जोर ओसरल्यानंतर संध्याकाळपर्यन्त रेल्वे वाहतूक सुरळीत झाली. मात्र प्रवाशांचे तीन ते चार तास हाल झाले.

शहर व उपनगरातील हिंदमाता, सायन, किंग्जसर्कल, कुर्ला, मिलन, अंधेरी, दादर टी. टी., दहिसर सब वे, कुर्ला एलबीएस रोड, खार आदी ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर परीणाम झाला. बेस्ट बस व अन्य वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. तर बेस्टच्या ६१ बसगाड्या रस्त्यावर बंद पडल्याने बेस्टच्या प्रवाशांचे हाल झाले.

‘मिठी’ने पातळी ओलांडली

मुसळधार पावसामुळे ‘मिठी’ नदीची (Mithi River) पातळी ३.९० मिटरपर्यंत वाढल्याने मिठी नदीलगतच्या कुर्ला येथील क्रांतीनगर झोपडपट्टीतील २५० नागरिकांना तात्काळ नजीकच्या पालिकेच्या शाळेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. दुपारनंतर मिठी नदीची पातळी खाली आल्यानंतर हे नागरिक पुन्हा आपल्या घरी परतले आणि त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

जोरदार पाऊस

पालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने (Disaster Management Cell) दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ४ ते ७ या कालावधीत शहर भागात ३६.०० मिमी, पूर्व उपनगरात ७५.०० मिमी तर पश्चिम उपनगरात ७३.०० मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तर १५ जुलै सकाळी ८ ते १६ जुलै सकाळी ८ या कालावधीत शहर भागात – ६४.४५ मिमी, पूर्व उपनगरात – १२०.६७ मिमी, तर पश्चिम उपनगरात – १२७.१६ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईतील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

पाणी साचलेली ठिकाणे

शहर -:

दादर टी. टी., गांधी मार्केट, किंग्ज सर्कल,हिंदमाता, वडाळा ब्रिज, संगमनगर

पूर्व उपनगर -:

कुर्ला सब वे, कुर्ला सिग्नल एलबीएस रोड, पी.एल.लोखंडे मार्ग, मानखुर्द सब वे, आर.सी.एफ.कॉलनी, सांडू गार्डन, अंजनाबाई नगर,अनुशक्ती नगर

पश्चिम उपनगर -:

अंधेरी सब वे, मिलन सब वे, दहिसर सब वे, साईनाथ सब वे, अंधेरी मार्केट, खार स्टेशन, शास्त्रीनगर,ओबेरॉय मॉल, नॅशनल कॉलेज, अजित ग्लास आदी सखल भागात मुसळधार पावसाने पाणी साचले होते.

बेस्टची वाहतूक वळवली ; बसगाड्या बंद पडल्या

मुसळधार पावसामुळे जवळजवळ ३० पेक्षाही जास्त सखल भागात पाणी साचले. त्यामुळे बेस्ट बसगाड्यांची वाहतूक २७ ठिकाणी वळविण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना त्याचा नाहक त्रास झाला. त्याचप्रमाणे बेस्टच्या ६१ बसगाड्या भर रस्त्यात बंद पडल्याने प्रवाशांचे हाल झाले.

तलाव क्षेत्रात चांगला पाऊस

मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस पडल्याने पूर्व उपनगरातील पवई, तुळशी व विहार या तलावांत चांगला पाऊस पडला. त्यामुळे तुळशी तलाव भरून वाहू लागला. तर विहार व पवई तलावातील पाणीसाठ्यात काहीशी वाढ झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here