@maharashtracity

मुंबई: झिका आजारातील गांभीर्य ध्यानात घेऊन मुंबईत (Mumbai) पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) सध्या झिकाच्या चाचण्या करण्यात येत आहेत. झिकाबाबत आरोग्य विभाग (Health department) सतर्क असून संशयित रुग्णांची तपासणी आणि चाचण्यांवर भर देण्यात येत आहे. वैद्यकीय महाविद्यालयांत देखील स्क्रीनिंग सुरू करण्यात येणार आहे. मात्र तूर्तास झिकाची चाचणी ही व्यावसायिक तत्वावर खाजगी प्रयोगशाळांमध्ये करण्याची परवानगी नसल्याचे पालिका प्रमुख रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

दरम्यान, झिका (Zika virus) आजारासाठी पालिका सज्ज असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु झाली आहे. तर गरोदर महिलांना असलेला झिकाचा धोका लक्षात घेत विशेष खबरदारी घेण्यात येत असल्याची डॉ. भारमल म्हणाले.

पुण्यात या आजाराचा एक रुग्ण सापडल्याने मुंबई पालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. झिका च्या संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच या रूग्णांचे सातत्याने निरीक्षणही करण्यात येणार आहे. सध्या ताप आलेल्या रूग्णांमध्ये डेंग्यू आणि चिकुनगुनिया यासारख्या आजारांमध्ये ज्या रूग्णांची चाचणी ही निगेटिव्ह येईल अशा रूग्णांची झिका व्हायरससाठी चाचणी करण्यात येणार आहे.

एडिस जातीच्या डासांपासून झिका विषाणूचा संसर्ग होतो. तसेच डेंग्यू (Dengue) आणि चिकुनगुनिया व्हायरसच्या माध्यमातूनही हा आजार पसरतो. म्हणूनच झिकाचा संसर्ग तपासण्यासाठी आता डेंग्यू आणि चिकुनगुनिया टेस्ट निगेटिव्ह आलेल्यांच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. तसेच झिकाची लक्षणे असणाऱ्या रूग्णांच्याही चाचण्या करण्यात येणार आहेत. झिकाची चाचणी करण्यासाठी आर टी-पीसीआर चाचणी (RT-PCR test) करण्यात येत असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here