@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेने (BMC) जुने भंगार (scrap) विक्रीस काढले असून त्यातून पालिकेच्या तिजोरीत सुमारे ३२ कोटी रुपये जमा होणार आहेत.

मुंबईत कोरोना (corona) व लॉकडाऊनमुळे (lockdown) अनेक कंपन्या, उद्योग बंद पडले. कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या व ते बेरोजगार झाले. या कोरोना महामारीचा मोठा आर्थिक फटका केंद्र, राज्य सरकार व मुंबई महापालिकेलाही बसला आहे.

त्यामुळे सरकारी उत्पन्नावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे पालिकेने उत्पन्न वाढीसाठी शुल्क वाढ, कर वाढीचे प्रस्ताव स्थायी समिती बैठकीत मंजुरीला आणलेले प्रस्ताव फेटाळण्यात आले. आता पालिकेची वक्रदृष्टी भंगार मालावर गेली असून भंगार माल विक्रीला काढल्याने पालिकेला कोट्यवधी रुपयांची कमाई मिळणार आहे.

मुंबई महापालिकेने विविध खात्यांतर्गत निर्माण होणाऱ्या लोखंडी, लाकडी, प्लास्टिक, चिंधी, पोते, तांबे, काचेच्या बाटल्या, काचेचे तुकडे, वापरलेल्या एक्स रे फिल्म, हायपोवॉटर आदी भंगार स्वरूपाचा माल भंगारात काढून तो खरेदी करण्यासाठी मे.ए.आय.एफ. एस.ओ. टेक्नोलॉजीस प्रा.लि. यांची दोन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे. हा कंत्राटदार पालिकेला मागील भंगार मालाच्या किमतीच्या दुप्पट भाव देण्यास तयार आहे.

जल अभियंता खात्यामार्फत नागरबाह्य विभागातील सहाय्यक अभियंता जल कामे, कापूरबावडी यांच्याकडील बाळकूम ते मुलुंड व सहाय्यक अभियंता ( नगरबाह्य विभाग) प्रमुख जलवाहिन्या यांच्याकडील मुलुंड ते सॅडेल टनेलपर्यन्त पूर्व आणि पश्चिम बाजूस असलेल्या १८०० मिमी व्यासाच्या जुन्या झालेल्या २ लोखंडी पाईपलाईनच्या कापून ठेवलेल्या तुकड्यांची भंगारात विल्हेवाट लावण्यात येणार आहे. या जुन्या पाईपलाईनच्या तुकड्यांचे वजन अंदाजित ७० लाख ६८ हजार किलो इतके आहे.

तसेच, भांडुप ऍकर ब्लॉक ते पवई ऍकर ब्लॉक पर्यंत पूर्व आणि पश्चिम बाजूस असलेल्या १८०० मिमी व्यासाच्या जुन्या झालेल्या लोखंडी पाईपलाईनच्या तुकड्यांचीही भंगारात विल्हेवाट लावण्यात येणार आहे. या लोखंडी पाईपांच्या तुकड्यांचे २९ लाख ५० हजार किलो इतके वजन आहे.

एकूण दोन्ही भंगार मालाचे वजन हे अंदाजे १ लाख १८ हजार किलो इतके असून प्रति किलो ३२.२१ रुपये या दराप्रमाणे या भंगार मालाची किंमत ३२ कोटी २६ लाख ७९ हजार रुपये इतकी होणार आहे. या भंगार विक्रीतून प्राप्त होणारी रक्कम पालिका जल अभियंता खात्यामार्फत पालिका तिजोरीत जमा करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here