निर्जीव प्रतिकृतीवर सुरु होणार ट्रायल

@maharashtracity

मुंबई: खारघर येथील टाटा मेमोरियल रुग्णालयाच्या (Tata Hospital) ऍक्टरेक्ट प्रकल्पात कर्करोगाच्या रुग्णांसाठी (Cancer Patients) वरदान ठरलेली प्रोटॉन बीम थेरेपी लवकरच सुरू होणार आहे.

अणुऊर्जा विभागाकडून (Atomic Energy Department) टाटा रुग्णालयाला आवश्यक मंजुरी मिळाल्याने वर्षा अखेरीस प्रोटॉन थेरेपीसह उपचार सुरू करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तूर्तास निर्जीव प्रतिकृतीवर (डमी फँटम) वापरण्याची परवानगी मिळाली असून प्रयोग यशस्वी झाल्यावर वर्षाच्या अखेरीस कर्करोगाच्या रुग्णांवर उपचारांसाठी परवानगी दिली जाणार आहे. पुढील वर्षी डॉक्टर आणि प्रोटॉन थेरेपीच्या मदतीने बरेच लोक कर्करोगमुक्त होतील अशी आशा निर्माण झाली आहे.

दरम्यान, हा प्रयोग टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत असल्याने उपचारांच्या खर्चावरही अनुदान दिले जाण्याची शक्यता आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोफत उपचार मिळतील.

यावर टाटा मेमोरियल रुग्णालयाचे उपसंचालक (शैक्षणिक) डॉ सिद्धार्थ लासकर, यांनी सांगितले की, जगातील सर्वात प्रगत प्रोटॉन बीम थेरपी अशी ही मशीन असून टीएमसी अट्रॅक्ट हे देशातील एकमेव सार्वजनिक रुग्णालय आहे. आता ही प्रोटॉन बीम थेरपी डमीवर वापरू. यावरुन किती प्रभावीपणे काम होऊ शकेल याची कल्पना येईल.

हा अहवाल डीएईला पाठवू आणि नवीन वर्षापासून परवानगी मिळाल्यास या अत्याधुनिक मशीनच्या मदतीने रुग्णांवर उपचार सुरू करण्यात येईल असे ही डॉ. लासकर म्हणाले.

प्रोटॉन बीम थेरेपीने दरवर्षी ८०० कर्करुग्णांवर उपचार होऊ शकतात असा अंदाज आहे. अमेरिकेत प्रोटॉन बीम थेरेपीसाठी सुमारे १ कोटी रुपये आकारले जातात. इथे मात्र निम्म्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. प्रोटॉन थेरेपीचा उपयोग प्रोस्टेट, पाठीचा कणा, मेंदू, यकृत, स्तन, डोके आणि मानेच्या इतर प्रकारच्या कर्करोगासाठी केला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here