@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिका (BMC) व वाहतूक पोलीस (Traffic Police) विभाग यांनी शहर व उपनगरातील धोकादायक रस्ते व रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलांवरून (Railway flyover) गणेशमूर्तीचे आगमन होताना व विसर्जन करताना त्यावर गर्दी करू नये, १६ टन वजनापेक्षा जास्त भार टाकू नये, अशी बंधने घातली आहेत. त्यामुळे लाखो गणेशभक्तांचा काहीसा हिरमोड झाला आहे

मुंबईत (Mumbai) गेल्या दीड वर्षांपासून मुक्काम ठोकलेल्या कोरोनाने (corona) गणेशोत्सवाच्या (Ganesh Festival) निमित्ताने गणेशभक्तांच्या जल्लोषावर सरकारमार्फत काही कठोर नियमांची बंधणे आणली आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहावर आधीच विरजण पडले आहे.

याबाबत गणेशोत्सव मंडळांची भूमिका मांडताना, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड नरेश दहिबावकर यांनी, धोकादायक पुलांबाबतच्या निर्बंधाचे गणेश मंडळे योग्य ते पालन करतील. मात्र, त्यामुळे पर्यायी मार्गांवर गर्दी होऊ शकते, त्याचे काय करणार, याचे उत्तर देण्याची मागणी केली आहे.

तसेच,पालिका आणि वाहतूक पोलिसांनी धोकादायक पुलांबाबत पर्यायी उपाययोजना कराव्यात आणि खड्डेमुक्त पर्यायी मार्ग उपलब्ध करावेत, असे दहीबावकर यांनी म्हटले आहे.

मुंबईत काही कालावधीपूर्वी हिमालय पादचारी पूल, अंधेरी येथील गोखले रेल्वे पूल कोसळण्याच्या दुर्घटना घडून त्यात जीवित आणि वित्तीय हानी झाली आहे. त्यामुळे या दुर्घटनांवरून बोध घेऊन मुंबई महापालिकेने मुंबईतील जुन्या अथवा दुरुस्ती सुरु असलेल्या रस्ते, रेल्वे उड्‌डाणपुलांचा वापर करताना गणेशभक्त व नागरिकांनी योग्य ती खबरदारी व काळजी घेण्याबाबत आवाहन केले आहे.

मुंबईत रस्ते, रेल्वे मार्गांवरील काही पूल हे अतिशय जुने झाल्याने धोकादायक अवस्थेत असल्याने त्यांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहेत. काही पुलांची कामे सुरू आहेत तर काही पुलांची कामे पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार आहेत.

करीरोड उड्डाणपूल व ऑर्थररोड किंवा चिंचपोकळी उड्डाणपूल, भायखळा या पुलांवर वाहन, नागरिक, गणेशभक्त यांची गर्दी जास्त प्रमाणात असू नये व १६ टनापेक्षा अधिक वजन होणार नाही,या बाबत काळजी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

या पुलांबाबत काळजी घ्या

घाटकोपर उड्डाणपूल, करीरोड उड्डाणपूल
ऑर्थर रोड किंवा चिंचपोकळी उड्डाणपूल
भायखळा उड्डाणपूल, मरीन लाईन्‍स उड्डाणपूल,
सँडहर्स्‍ट रोड रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅन्‍ट रोड व चर्नी रोडदरम्यान), फ्रेंच रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅन्‍ट रोड व चर्नी रोडदरम्यान), केनडी रेल्वे उड्डाण पूल (ग्रॅन्‍ट रोड व चर्नी रोडदरम्यान) फॉकलॅण्ड रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅन्‍ट रोड व मुंबई सेंट्रलदरम्यान), बेलासीस, मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ महालक्ष्‍मी स्‍टील रेल्वे उड्डाणपूल, प्रभादेवी कॅरोल रेल्वे उड्डाणपूल, दादर टिळक रेल्वे उड्डाणपूल आणि
अंधेरी गोखले रेल्वे उड्डाणपूल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here