@maharashtracity
मुंबई: बृहन्मुंबई महानगर पालिका (BMC) वार्ताहर संघाचे माजी पदाधिकारी व ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत लिंगायत (६५) यांचे मंगळवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने जोगेश्वरी (पूर्व), संजय नगर येथील निवासस्थानी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. चकाला पारशीवाडा येथील स्मशानभूमीत आज संध्याकाळी ७.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
चंद्रकांत लिंगायत मुंबई महापालिका मुख्यालयात गेल्या ३० वर्षांपेक्षाही जास्त काळ वृत्तसंकलन करीत होते. त्यांनी दै.शिवनेर, दिव्य भास्कर आदी दैनिकांत काम केले. ते अत्यंत मनमिळावू, प्रेमळ स्वभावाचे पत्रकार होते. त्यांचे सर्वपक्षीय नेते, खासदार, आमदार, गटनेते, नगरसेवक, पालिकेतील अधिकारी आदींशी चांगले संबंध होते. पालिकेत वृत्तसंकलन करण्यासाठी येणाऱ्या नवख्या पत्रकारांना ते पालिका कामकाजाबाबत नेहमी मार्गदर्शन करायचे. सामाजिक कार्याची दृष्टीने ते गरजवंत व्यक्तींना सहकार्य करीत असत.