@maharashtracity

मुंबई: मुंबईत (Mumbai) सध्या कोरोनावरील लसीचा (corona vaccine) तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना लसीकरण केंद्रांवर रांगा लावूनही लस मिळण्यात अडचण होत आहे. परिणामी महिला, ज्येष्ठ नागरिक पालिकेच्या नावाने बोटे मोडत व शिव्याशाप देत नाईलाजाने घरी परतत आहेत.

पालिकेच्या कुर्ला येथील भाभा रुग्णालयात (Bhabha hospital) लसीकरणासाठी गेलेल्या म्हाडा कॉलनीतील (Mhada colony) काही नागरिकांना, विशेषतः महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांनाही लसीच्या तुटवड्याचा असाच काहीसा फटका बसला व त्यांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागले आहे.

मुंबईत सध्या कोरोनाला रोखण्यासाठी पालिका आरोग्य खात्यामार्फत कोविड सेंटर, पालिका रुग्णालये आदी ठिकाणी १६ जानेवारीपासूम लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र आवश्यक लसीचा पुरवठा होत नसल्याने पालिकेला अनेकदा लसीकरण मोहीम थांबवावी लागली आहे. त्यामुळे लसीचा पहिला व दुसरा डोस घेणारे ताटकळत आहेत.

खासगी रुग्णालयात महागड्या दरात लसीकरण होत आहे. मात्र गरीब, सामान्य, मध्यम वर्गातील नागरिकांना कोरोनामुळे नोकऱ्या, रोजगार गमावलेल्या नागरिकांना खासगी रुग्णांलयात लसीचा डोस घेणे परवडत नाही. त्यामुळे त्यांना पालिका, सरकारी रुग्णालये, दवाखाने येथे सुरू असलेल्या लसीकरणावरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे या लसीकरण केंद्रांवर गेल्यावर रांग लावूनही कधी कधी लस मिळत नसल्याने नागरिक तीव्र संताप व्यक्त करतात. शक्यतो पालिका लसीकरण केंद्रांवर कमी लस असल्यास अथवा लसीचा तुटवडा असल्यास लसीकरणं केंद्र बंद ठेवण्याबाबत नागरिकांना कळवते.

मात्र कधी कधी लसीचा तुटवडा असताना नागरिकांना त्याची पूर्व कल्पना दिली जात नसल्याने संपूर्ण दिवसभर लसीसाठी रांग लावणाऱ्या नागरिकांना जेव्हा त्यांचा नंबर येण्यापूर्वी काही वेळ अगोदरच लसीचा साठा संपल्याचे समजते व आता लसीचा डोस न घेताच घरी रिकाम्या हाताने परत जावे लागणार असल्याचे समजल्यावर त्यांना तीव्र संताप येणे साहजिकच आहे.

असाच काहीसा प्रकार कुर्ला येथील भाभा रुग्णालयात घडल्याचे म्हाडा कॉलनी येथील महिलांनी सांगितले. या रुग्णालयात लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने म्हाडा कॉलनीमधून लस घेण्यासाठी आलेल्या महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याचे सांगण्यात आले आहे.

लसीचा तुटवडा असल्यास त्याची पूर्वकल्पना नागरिकांना द्यायला पाहिजे, असे या म्हाडा कॉलनीतील महिलांचे म्हणणे होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here