मुंबई: गोवंडी येथील पालिकेच्या उद्यानाला “टिपू सुलतान’ याचे नाव देण्याच्या मागणीवरून आज बाजार व उद्यान समितीच्या ऑनलाईन बैठकीत मोठा गदारोळ झाला. शिवसेनेच्या सदस्यांनी प्रस्ताव व उद्यानाचे काम अपूर्ण असल्याचे सांगत प्रस्ताव परत पाठविण्याची मागणी केली.

तर भाजपच्या नगरसेवकांनी उपसूचना मांडण्याची आणि प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली. यावेळी, टिपू सुलतानच्या नावाची मागणी करणाऱ्या समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी, बोलायला संधी मिळाली नसल्याची तक्रार केली. त्यावरून मोठा गदारोळ झाला. अखेर समिती अध्यक्ष प्रतिमा खोपडे यांनी सदर प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठविण्याचा निर्णय जाहीर केला.

त्यामुळे संतप्त भाजप नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, याप्रकरणी समिती अध्यक्षा खोपडे यांना घेराव घातला. त्यामुळे अध्यक्ष खोपडे यांनी बैठक तहकूब केली.

त्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या कार्यालयात धाव घेऊन झाल्या घटनाप्रकाराबाबत तक्रार करून निषेध व्यक्त केला.

गोवंडी येथील उद्यानास टिपू सुलतान उद्यान नाव देण्यास शिवसेनेचा छुपा पाठिंबा असून प्रस्ताव रद्द करण्याची भाजपची मागणी धुडकावत शिवसेना अध्यक्षांनी प्रस्ताव आयुक्तांकडे फेरविचारार्थ परत पाठवित भाजपची मागणी धुडकावल्याचा व विषयाला बगल दिल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला आहे. पालिकेच्या उद्यानाला ‘ टिपु सुलतान उद्यान’ असे नांव देण्यास भाजपचा तीव्र विरोध असून नामकरण आम्ही होऊ देणार नाही. प्रसंगी रस्त्यावर उतरु, असा इशाराही भाजपतर्फे देण्यात आलेला आहे.

याबाबत, बोलताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी, प्रत्येक नगरसेवकाला आपल्या विभागातील वास्तूला हवे ते नावदेण्याचा अधिकार आहे. यापूर्वी, टिपू सुलतानचे नाव रस्ते, उद्यान आदि ठिकाणी देण्यात आलेले आहे. त्यासंदर्भातील माहिती मागविण्यात आली असून या माहितीनंतर नियमाने योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

हिंदू जनजागृती समितीचा विरोध कायम

पालिका उद्यानाला टिपू सुलतान याचे नाव देण्याचा प्रस्ताव कायमस्वरूपी रद्द होईपर्यँत हिंदुत्ववादी कायदेशीर मार्गाने विरोध करतील. टिपू सुलतानाच्या नावाचा प्रस्ताव पुन्हा चर्चेला आल्यास हिंदु समाज सहन करणार नाही, असा इशारा हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ.उदय धुरी यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here