@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिका (BMC) आरोग्य विभागाच्या पथकाने शहर व उपनगरे येथे अंथरुणाला खिळून असलेल्या व नोंदणी झालेल्या ४,५२५ जणांपैकी आतापर्यंत २,५२५ जणांना लसीचा पहिला डोस दिला आहे. उर्वरित नागरिकांनाही लस देण्यात येत आहे. पालिकेने घरोघरी जाऊन लसीकरण करण्याबाबत हाती घेतलेल्या या मोहिमेची दखल घेऊन उच्च न्यायालयानेही (Bombay High Court) कौतुक केले आहे.

यासंदर्भातील माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी दिली आहे.

राज्य सरकारने निर्माण केलेल्या टास्क फोर्सच्या (Task Force) सूचनेनुसार महापालिकेतर्फे १२ ते १८ वयोगटातील २० लाख मुलांचे लसीकरण (vaccination) करण्यासाठी लसीकरण केंद्रांवर व्यवस्था करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तिसऱ्या लाटेसाठी १ लाख बेडची व्यवस्था

वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार मुंबई महापालिकेने कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सर्वतोपरी तयारी केली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या वाढल्यास तातडीची उपाययोजना म्हणून पालिका, सरकारी रुग्णालये, सात जंबो कोविड सेंटर (Jumbo Covid Centres), नर्सिंग होम, खासगी रुग्णालये आदी ठिकाणी एक लाख बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या पालिकेकडे ३० हजार बेड उपलब्ध असून त्यापैकी फक्त ६०० बेडवर रुग्ण आहेत.

दररोज २ लाख डोस देण्याचे नियोजन

तिसरी लाट रोखण्यासाठी पालिका सज्ज झाली आहे. मुंबई महापालिकेला दररोज लसीचा आवश्यक साठा वेळेत उपलब्ध झाल्यास लसीकरण प्रक्रियेला वेग येईल. पालिकेने दररोज २ लाख डोस देण्याचे नियोजन केले आहे.

मुंबईत पालिका, सरकार आणि खासगी मिळून ४३८ केंद्रांवर १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. आतापर्यंत ६३ लाख ४० हजार जणांना पहिला, तर २१ लाख ६० हजार जणांनी घेतला दुसरा डोस घेतला आहे. यामध्ये एकूण ८५ लाख डोस देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here