पुन्हा नोटीस बजावणार 

बंगल्यात अनधिकृत काहीच नसल्याचा राणेंचा दावा

तर कारवाई अटळ – महापौर  

मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व सेना नेत्यांशी पंगा घेणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जुहू येथील ‘अधीश’ या बंगल्यावर मुंबई महापालिकेच्या के/पूर्व वार्ड कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात धडक देऊन बंगल्याची चांगलीच झाडाझडती घेतली. या बंगल्याची पाहणी झाल्यानंतर आता महापालिकेकडून (BMC) बंगल्याबाबत अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा राणे यांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे समजते.विषेश म्हणजे पालिकेचे पथक त्यांचे काम करीत असताना मंत्री नारायण राणे हे स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते. पालिका अधिकाऱ्यांच्या प्रत्येक हालचालीवर मंत्री नारायण राणे हे बारीक लक्ष ठेऊन होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.पालिकेचे पथक राणे यांच्या बंगल्यावर दाखल होण्यापूर्वीपासून ते पथक बंगल्यामधून बाहेर पडेपर्यंत या परिसरात तणावाचे वातावरण होते.

काय आहे नेमके प्रकरण ?
जुहू, तारा येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी, ‘अधीश’ हा बंगला काही वर्षांपूर्वी उभारला होता. मात्र, हा बंगला उभारताना ‘सीआरझेड’ कायद्याचे (CRZ act) उल्लंघन झाल्याची तक्रार एका आरटीआय कार्यकर्त्याने (RTI Activist) महापालिकेकडे केली होती. त्याची गंभीर दखल घेऊन पालिकेच्या  के/पूर्व वार्ड कार्यालयातर्फे राणे यांना बंगल्याच्या अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस पाठविण्यात आली होती. 
पालिकेचे एक पथक बंगल्याला भेट देऊन पाहणी करणार असून बंगल्याच्या सर्व प्रकारच्या बांधकाम, परवानग्या यांबाबतची कागदपत्रे तयार ठेवण्याचे पालिकेने नोटिसद्वारे सूचित केले  होते. त्यानुसार, पालिकेच्या संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी १८ फेब्रुवारी म्हणजे शुक्रवारी सायंकाळी ५.१० वाजेच्या सुमारास राणे यांच्या बंगल्याला भेट दिली होती. मात्र पालिकेचे पथक कोणतीही कारवाई न करता माघारी परतले होते. मात्र त्यानंतर पालिकेच्या पथकाने राणे यांच्या बंगल्यावर पुन्हा सोमवारी धडक देण्याचे बजावले होते.
त्यानुसार, पालिकेच्या के/ पूर्व वार्डाचे साहाय्यक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह किमान ८ – ९ अधिकाऱ्यांनी राणे यांच्या बंगल्याला सकाळीच भेट देऊन बंगल्याची झाडाझडती घेतली. यावेळी, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे स्वतः बंगल्यात उपस्थित होते, असे खात्रीलायक वृत्त आहे.

पालिकेकडून पुन्हा देणार नोटीस
पालिकेच्या अधिकाऱ्यांनी राणे यांच्या बंगल्यातअनधिकृत बांधकामाबाबत पाहणी केली. तसेच, बंगल्याबाबतची पालिकेकडील माहिती, कागदपत्रे आदींची तपासणी केली. या बंगल्याची पाहणी झाल्यानंतर आता महापालिकेकडून बंगल्याबाबत अहवाल तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा राणे यांना बंगल्याबाबत नोटीस बजावण्यात येणार आहे. या नोटिशीचे स्वरूप नेमके कसे असणार, याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. मात्र पुढील कारवाईच्या दृष्टीनेच पालिका नारायण राणे यांना नोटीस पाठवणार असल्याचे समोर येत आहे.

सुडाचे राजकारण -: देवेंद्र फडणवीस 
राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi government) हे सुडाचे राजकारण करीत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यावरील कारवाई, आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane), रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर झालेली कारवाई, किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला हे सर्व लोकांनी पाहिले आहे. महाविकास आघाडी सरकार हे सुडाचे राजकारण करीत आहे, असे आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहेत. 

अनधिकृत काहीच नाही – राणे
आम्ही पालिका व अन्य सर्व परवानग्या घेऊन मगच बंगल्याची उभारणी केली आहे. एक इंचही अनधिकृत बांधकाम केलेले नाही, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. तर आमदार नितेश राणे यांनी, बंगल्याच्या बांधकामाबाबत नव्याने कोणतीही नोटीस अद्यापपर्यंत आलेली नाही. नोटीस केंद्राकडून येणार की केंद्राच्या नावाखाली राज्यातील पर्यावरण विभाग नोटिस पाठविणार ? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. जेव्हा नोटीस येईल त्यावर अभ्यास करून त्यास उत्तर देण्यात येईल, असे राणे यांनी सांगितले.

 …तर कारवाई अटळ – महापौर
जर राणे यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याचे अथवा सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यास बंगल्यावर कारवाई होणारच. राणे यांच्या बंगल्याबाबत केंद्र सरकारनेही त्यांना नोटीस पाठवलेली होती. त्यामुळे या प्रकरणात फक्त पालिकेच्या कारवाईकडे बोट न दाखवता केंद्राच्या कारवाईकडेही लक्ष द्यायला पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here