Twitter : @NalavadeAnant

मुंबई

कोकण, नाशिक, पुण्यासह राज्यातील महत्वाच्या पायाभूत विकास प्रकल्पांच्या उभारणीतील अडथळे तात्काळ दूर व्हावेत, विकासाची कामे विनाविलंब मार्गी लागावीत यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा’च्या माध्यमातून कार्यरत आहे. हा कक्ष मुख्यमंत्री महोदयांच्या ‘वॉर रुम’ला सहाय्यक, पुरक भूमिका बजावत आहे. ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा’ चा उद्देश राज्याच्या विकास कामातील अडथळे दूर करुन विकास प्रक्रिया गतिमान करणे, महाराष्ट्राला देशातील अग्रेसर राज्य बनवणे हा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयातर्फे शनिवारी स्पष्ट करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मंत्रिमंडळ राज्याची विकास प्रक्रिया गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार देखील ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा’च्या माध्यमातून आपले योगदान देत असून पवार यांनी गेल्या आठवड्यात घेतलेली ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा’ची बैठक ही २४ वी बैठक होती, असेही यावेळी नमूद करण्यात आले.

या बैठकीत कोकणातील पर्यटन केंद्रांना जोडणारा कोकण सागरी महामार्ग, रेवस-रेड्डी सागरी महामार्ग, सातारा-अलिबागची वैद्यकीय महाविद्यालये, पुणे मेट्रो, पुणे रिंग रोड, मुंबईतील जीएसटी भवन, पुणे येथील कृषी भवन, शिक्षण आयुक्तालय, कामगार कल्याण भवन, सहकार भवन, नोंदणी भवन, साखर संग्रहालय, इंद्रायणी मेडिसिटी, पोलिस गृहनिर्माण प्रकल्प, शिरुर-खेड-कर्जत मार्गाचे चौपदरीकरण, ‘सारथी’चे प्रशिक्षण केंद्र, वढू- तुळापूरचे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, पंढरपूर शहर, विठ्ठल मंदिर परिसराचा विकास आदी विकासकामांच्या प्रगतीचा तसेच निधी उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला. तसेच विकास कामातील अडथळे दूर करण्याबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले. त्याचवेळी दर पंधरवड्याला नियमितपणे कक्षाची बैठक घेऊन विकास कामांचा आढावा घेतला जाईल. प्रक्रियेतील अडथळे दूर केले जातील. विकास प्रक्रिया गतिमान केली जाईल, असेही उपमुख्यमंत्री कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वॉर रुम’ च्या माध्यमातून निश्चित केलेल्या ध्येयपूर्तीसाठी, ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्ष’ सहायकाची भूमिका यापुढेही पार पाडत राहिल. राज्यातील विकास प्रकल्पांना केंद्राची मंजूरी, मदत, सहकार्य मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न केला जाईल. मुख्य सचिवांसह प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, ‘वॉर रुम’चे प्रमुख राधेशाम मोपलवार हे सर्वच जण कक्षाच्या बैठकीला उपस्थित राहून ‘वॉर रुम’ तसेच ‘प्रोजेक्ट मॉनिटरींग कक्षा’च्या माध्यमातून योगदान देत आहेत, असे सांगत, या सर्व प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम निश्चितच दिसतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री कार्यालयातर्फे व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, विकास प्रक्रिया गतिमान करण्याच्या या प्रयत्नांकडे वस्तुनिष्ठ आणि सकारात्मकपणे पहावे, असे आवाहनही कार्यालयातर्फे करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here