Twitter: @vivekbhavsar

मुंबई

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळात खांदेपालट करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न असून कार्यक्षमता दाखवू न शकलेल्या नापास मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात येणार असल्याचे समजते. यात महाराष्ट्रातून कपिल पाटील आणि भागवत कराड यांचे नाव असल्याचे समजते.

दिल्लीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा समावेश झालेला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून आणि भाजपसोबत येऊन सत्ता स्थापन करण्याला 30 जूनला एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, अद्यापी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कुठल्याही सदस्याला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही.

लोकसभा निवडणुकीला एका वर्षापेक्षाही कमी कालावधी शिल्लक राहिलेला आहे. अशा वेळी नवीन मित्र पक्षांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेऊन त्या – त्या राज्यातील पक्षाची स्थिती भक्कम करण्याचा नरेंद्र मोदी यांचा मानस असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्रातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने नुकताच भारतीय जनता पक्षासोबत घरोबा केला. पंजाबमधील भाजपचा जुना मित्र अकाली दल काही मुद्द्यांवर मतभेद झाल्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए मधून बाहेर पडला होता. अकाली दलाला विधानसभा निवडणुकीत मोठाच फटका बसला, पण त्याचवेळी भाजपला देखील हा फटका सहन करावा लागला. पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने मुसंडी मारली ती केवळ अकाली दल आणि भाजपची आघाडी नसल्यामुळेच, असे म्हटले जाते. त्यामुळे अकाली दल पुन्हा एकदा भाजपमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळात फेरबदल करताना काही मंत्र्यांना वगळून एन डी ए मध्ये सामील झालेल्या किंवा होणाऱ्या नवीन घटक पक्षांच्या सदस्यांना स्थान देण्यात येणार असल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांच्या गटातील बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश केला जाणार आहे. अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हे फेरबदल करताना महाराष्ट्रातील भिवंडीचे खासदार कपिल पाटील आणि राज्यसभा सदस्य डॉक्टर भागवत कराड यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आगरी समाजाला भाजपकडे आकर्षित करण्यासाठी कपिल पाटील यांना मंत्रिपद देण्यात आले. मात्र केंद्रीय मंत्री असून देखील ते भिवंडीच्या बाहेर सहसा दौरा करत नाही, असा एक आक्षेप प्रदेश भाजपकडून नोंदवला गेला आहे, तर दुसरीकडे कपिल पाटील यांच्यामुळे भाजपाकडे आगरी मतदार वळतील, अशी जी अटकळ बांधली गेली होती, त्याला पूर्णपणे छेद गेला आहे. म्हणून कपिल पाटील यांना वगळले जाणार असल्याची माहिती सूत्राने दिली.

तर अर्थराज्यमंत्री म्हणून डॉ भागवत कराड यांच्या प्रगती पुस्तकात नापासचा शेरा लागला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. डॉ कराड यांच्या कामकाजावर पक्ष समाधानी नसल्याचे सांगितले जाते. आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांना देखील मंत्रिमंडळातून वगळून त्यांच्या जागी नंदुरबारच्या खासदार डॉ हिना गावित यांची वर्णी लावली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र डॉ हिना गावित यांना केंद्रीय मंत्रिमंडळ घेताना त्यांचे पिताश्री डॉ विजयकुमार गावित यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून वगळण्याची अट होती. डॉ विजय कुमार गावीत यांच्या आरोग्याच्या काही तक्रारी असून आमदार म्हणून ही त्यांची शेवटची टर्म असेल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे आपल्या पिताश्रींना मंत्रिमंडळातून वगळू नये आणि मला केंद्रीय मंत्रिमंडळात सध्या स्थान देऊ नये, अशी विनंती डॉ हिना गावित यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याकडे केली असल्याचे समजते. त्यामुळे कदाचित भारती पवार यांना मंत्रिमंडळातून वगळले जाणार नाही, अशीही माहिती सूत्रांनी दिली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here