विधान परिषद उपसभापतींचा विधान भवनात राजकीय पक्षप्रवेश
Twitter : @NalavadeAnant
मुंबई
विधिमंडळाची परंपरा, नियम, संकेत, प्रथा यांना खुद्द मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पायदळी तुडवून एखाद्या घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीला – विधान परिषद उपसभापती यांचा विधिमंडळातच राजकीय पक्षप्रवेश घडवून आणला गेला. असा प्रकार विधिमंडळात पहिल्यांदाच घडल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
विधानपरिषदेच्या उपसभापती आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या डॉ नीलम गोऱ्हे यांना सर्व संसदीय प्रथा परंपरा बाजुला ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधिमंडळातच शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये प्रवेश देण्यात आला.
विधानभवनापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे कार्यालय अस्तित्वात असताना हा पक्षप्रवेश विधिमंडळातच झाल्याने यातून काही वेगळे संकेत देण्याचा काही प्रकार आहे का, असेही प्रश्न या निमित्ताने विचारले जात आहेत.
सकाळपासूनच डॉ नीलम गोऱ्हे यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरु होती. त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून उपसभापती आणि विधानपरिषद विरोधी पक्ष नेतेपद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिसकावल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी भगवा गमछा देऊन नीलम गोऱ्हे यांचे शिवसेनेत स्वागत केले.
पक्ष प्रवेशानंतर नीलम गोऱ्हे यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरची आपली भूमिका विशद केली. आपली कोणतीही नाराजी नाही, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. नीलम गोऱ्हे ह्या केवळ विधान परिषदेच्या आमदार नाहीत तर त्या विधान परिषदेच्या उपसभापती आहे. महत्त्वाचं म्हणजे नीलम गोऱ्हे यांनी २२ फेब्रुवारी १९९८ रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता. तेव्हापासून त्या अत्यंत संयमाने, नेटाने आणि अभ्यासू वृत्तीने शिवसेनेची बाजू मांडत आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून त्यांच्या आमदारकीची ही चौथी टर्म आहे.
नीलम गोऱ्हे यांनी राजकीय नेत्या होण्याअगोदर उपेक्षित, पीडित महिलांसाठी काम केले असून त्यांच्या विविध प्रश्नंसंदर्भात आवाज उठवून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. एक शिवसैनिक म्हणून शिवसेनेत येण्याआधी त्यांनी दलित पँथरमध्ये नामदेव ढसाळ, रामदास आठवले, बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत काही काळ कामही केले आहे. त्यानंतर रिपब्लिकन गटातटाच्या राजकारणाला कंटाळून त्या शिवसेनेकडे आल्या. मात्र आजचा त्यांचा निर्णय हा ठाकरे गट शिवसेना पक्षासाठी धक्कादायक असल्याचे मानले जाते.
दरम्यान, मागील अधिवेशनात भाजपकडून नीलम गोऱ्हे यांच्यावर दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव मागे घेण्यात येणार असून कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत प्रवीण दरेकर यांनी असा प्रस्ताव मांडल्याचे सांगण्यात येत आहे. प्रसाद लाड यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिल्याचे समजते. उपसभापती नीलम गोऱ्हे पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप करत तत्कालीन विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. मात्र आता हा दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव मागे घ्यावा,असा प्रस्ताव दरेकर यांनी मांडल्याचे समजते.
पक्ष प्रवेशानंतर नीलम गोऱ्हे म्हणाल्या की मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली शिवसेना योग्य मार्गावर जात असून त्यांच्यासोबत मी जात आहे. १९९८ साली मी बाळासाहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. विद्यमान केंद्र सरकारने अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले असून त्यात राम मंदिर, ट्रिपल तलाख, ३७० कलम, यासारखे अनेक निर्णय एनडीएने घेतले. राष्ट्रीयत्व म्हणजेच हिंदुत्व यावर हा पक्ष पुढे जात आहे. पक्षावर माझी नाराजी नव्हती, असे नमूद करून नीलम गोऱ्हे यांनी सटरफटर लोक ठाकरे यांच्या शिवसेनेत आल्याने नाराजी होत नसते, असे सांगत त्यांनी ठाकरे गटाच्या फायर ब्रेंड नेत्या सुषमा अंधारे यांच्यावरच टीकास्त्र सोडले.