@maharashtracity
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या तसेच त्यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानी आणि कार्यालयावर आयकर विभागाने (IT department) छापेमारी केली. निकटवर्तीय आणि कंत्राटदारांच्या संबंधित ३५ हून अधिक ठिकाणी केलेल्या प्राप्तिकर विभागाच्या छापेमारीत १३० कोटी रुपयांपेक्षा अधिक स्थावर मालमत्ता आढळली आहे. त्यामुळे यशवंत जाधव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कंत्राटदारांनी २०० कोटी रुपयांचे उत्पन्न दडवल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. यावरून आता भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला असून, यशवंत जाधवांनी मुंबईतील ३६ इमारती विकत घेतल्या आहेत, असा मोठा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.
प्राप्तिकर विभागाने गेल्या आठवड्यात जाधव कुटुंबीयांसह त्यांचे निकटवर्तीय तसेच सिव्हिल कंत्राटदारांसह ३५ ठिकाणी छापेमारी केली. या शोध मोहिमेदरम्यान, महत्त्वपूर्ण कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे सापडले असून ते जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेले पुरावे कंत्राटदार आणि जाधव यांच्यातील संबंध असल्याचे स्पष्ट करत आहे.
झाडाझडतीतून सुमारे १३० कोटी रुपयांपेक्षा अधिक ३६ स्थावर मालमत्तांची माहिती उघडकीस आली आहे. यातच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत यशवंत जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
यशवंत जाधवांनी मुंबईतील ३६ इमारती विकत घेतल्या
शिवसेना नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी यशवंत (Shiv Sena MLA Yamini Jadhav) यांनी २४ महिन्यात मुंबईत १००० घर/दुकान/गाळे असलेल्या ३६ बिल्डिंग (जुन्या पगडीच्या इमारती) विकत घेतल्या. १००० कोटींचा घोटाळा बाहेर आला आहे. ईडी, कंपनी मंत्रालय, आयकर विभागाद्वारा तपास चालू आहे, काही दिवसात कारवाईची अपेक्षा, असे ट्विट किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच प्राप्तीकर विभागाने यशवंत जाधव यांच्या भायखळा येथील घरावर छापा टाकला होता. आयकर खात्याचे अधिकारी तब्बल ७० तास यशवंत जाधव यांच्या घरी ठाण मांडून बसले होते. यावेळी अधिकाऱ्यांनी अनेक कागदपत्रांची तपासणी केली होती.
त्यामुळे आता या प्रकरणात यशवंत जाधव यांच्यावर कोणती कारवाई होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याशिवाय, आयकर खात्याने राहुल कनाल, संजय कदम आणि विजय लिपारे या शिवसेनेच्या नेत्यांवरही छापे टाकले होते.