गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई, दि. 8 – कोरेगाव भीमा प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मी लवकरच बैठक घेईल आणि विस्तृत आढावा घेऊनच सरकारची भूमिका मांडेल. आधीच्या सरकारच्या भूमिकेविरुद्ध वेगळी मते मांडली म्हणून कोणाला शहरी नक्षलवादी म्हणणे योग्य ठरणार नाही, असे मत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज माध्यमांशी बोलताना मांडले.
कोरेगाव – भीमा प्रकरणात कोणाचा सहभाग होता का याची अन्य मुद्द्याप्रमाणे चौकशी सुरु आहे . चौकशीअंती नेमकी वस्तुस्थिती समोर येईल, असे श्री. देशमुख म्हणाले . कोरेगाव- भीमा प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात आपण कुठलेही विधान माध्यमांमध्ये केलेले नाही. , तथापि आपल्या तोंडी काही विधाने विशिष्ट माध्यमांनी घातली, असे त्यांनी स्पष्ट केले .
जेएनयूमधील हिंसाचाराची घटना अत्यंत दुर्दैवी होती, असे श्री. देशमुख म्हणाले . या घटनेचा निषेध करताना गेटवे ऑफ इंडियावर निदर्शने करण्यात आली . त्यावेळी एका तरुणीच्या हातात फ्री कश्मीर असा फलक होता. याबाबत पत्रकारांनी विचारले असता श्री. देशमुख यांनी स्पष्ट केले की, त्या तरुणीने पोलिसांना जे बयान दिले आहे त्यावरून तिचा उद्देश राष्ट्रद्रोहाचा नव्हता असे प्राथमिकदृष्ट्या दिसते . काश्मीरमध्ये अजूनही मोबाईल , इंटरनेट सेवा सुरळीत नाही . नेत्यांना नजरकैदेत ठेवले आहे . या परिस्थितीपासून काश्मीर मुक्त करावा या भूमिकेतून तिने फ्री काश्मीरचा फलक लावला असे तिचे म्हणणे आहे . याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत .