मुंबई: रस्ते अपघातातील जखमींवर गोल्डन अवरमध्ये प्राण वाचविणारी उपचार यंत्रणा ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांचा जीव वाचण्यास मोठी मदत होणार आहे, असे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील तळेगाव टोलनाक्याच्या बाजूला ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आरोग्यमंत्रांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत पुलकुंडवार आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. शिंदे म्हणाले, एमएसआरडीसी, आरोग्य विभाग, एसजी डायग्नोस्टिक आणि पवना हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातांची पार्श्वभूमी लक्षात घेता अपघातग्रस्तांना तातडीने प्राण वाचविणारी उपचार यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे आता या ट्रॉमा केअर युनिटमुळे अपघातग्रस्त नागरिकांना पहिल्या तासात (गोल्डन अवर) योग्य उपचार मिळतील जेणेकरून त्यांचे प्राण वाचवले जाऊ शकतील. या ट्रॉमा केअरमध्ये जखमींवर प्राथमिक उपचार करून आवश्यकता भासल्यास तिथून जवळ असलेल्या हॉस्पिटलमध्ये जखमींना नेण्यात येईल, असे सांगून आरोग्यमंत्री म्हणाले, हे ट्रॉमा केअर 24 तास सुरू राहणार असून तेथे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, औषधे, प्राथमिक उपचारासाठी छोटे शस्त्रक्रिया गृह, कार्डिअक ॲम्ब्युलन्स, शीघ्र प्रतिसाद वाहन (क्यूआरव्ही) आदी व्यवस्था करण्यात आली आहे.

या द्रूतगती महामार्गावर अशा प्रकारची उपचाराची यंत्रणा प्रथमच झाली असून एमएसआरडीसी, पोलीस व आरोग्य विभाग, सेव लाईफ फाऊंडेशन आणि पवना मेडिकल फाऊंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून अपघातग्रस्तांचे प्राण वाचतील. या ट्रॉमा केअर सेंटरसाठी हॉटलाईन क्रमांक देण्यात येणार असून त्यावर कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात कमी व्हावेत यासाठी सेव लाईफ फाऊंडेशनसोबत सामंजस्य करार करून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

ट्रॉमा केअर प्रकल्प संचालक डॉ. सुयोग गुरव यांनी यावेळी प्रकल्पाबाबत माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here