आरएनए ग्रुपमधील २०० कर्मचा-यांची

मनसे अध्यक्षांना पत्राद्वारे विनंती

मुंबई : आरएनए ग्रुपच्या (RNA group) सुमारे ४०० कर्मचारी- कामगारांना गेली जवळपास दोन वर्षं पगार मिळालेला नाही. आपल्या हक्काचे पैसे व देणी कंपनीकडून मिळवण्यासाठी ह्या कर्मचा-यांनी अनेक प्रयत्न केले, वेगवेगळ्या कार्यालयांचे उंबरठे झिजवले, पण त्यांना कुठेही न्याय मिळाला नाही. अखेर आरएनए ग्रुपच्या कर्मचा-यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना पत्र लिहून ह्या प्रकरणात “न्याय मिळवून द्या तसंच कर्मचा-यांची आर्थिक पिळवणूक व दमदाटी करणा-या आरएनए मालकाला धडा शिकवावा”, अशी विनंती केली आहे.

आरएनए ग्रुप ही मुंबईतील एक मोठी रिअल इस्टेट (Real Estate) कंपनी आहे. ह्या कंपनीच्या कर्मचा-यांना फेब्रुवारी २०१८पासून पगार मिळालेला नाही. गेल्या दोन-तीन वर्षांत अनेक कर्मचा-यांना कंपनीच्या मालकाने दमदाटी करून नोकरी सोडण्यास भाग पाडले, तर आर्थिक मंदी असल्यामुळे दुसरीकडे नोकरी मिळणं शक्य नसल्यामुळे अनेकजण पगार मिळत नसतानाही काम करत राहिले. पीएफ, ग्रॅच्युइटी आणि फाॅर्म १६ ची थकबाकीसुद्धा कर्मचा-यांना मिळालेली नाही. यासंदर्भात आरएनए कंपनीचे संचालक अनुभव अग्रवाल (Abubhav Agrawal) आणि गोकुळ अग्रवाल (Gokul Agrawal) यांच्याशी अनेकदा संपर्क साधूनही ते कर्मचा-यांना कोणताही प्रतिसाद देत नसल्यामुळे कर्मचा-यांनी कामगार न्यायालय (labour court) तसंच नॅशनल कंपनी लाॅ ट्रिब्यूनल (NCLT) येथेही पत्रव्यवहार केला. मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. आता शेवटचा पर्याय म्हणून कंपनीच्या सुमारे २०० कर्मचा-यांनी लेखी पत्राद्वारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साकडं घातलं आहे. कर्मचा-यांच्या हक्काच्या थकबाकीची रक्कम २० कोटी इतकी आहे.

याविषयी अधिक माहिती देताना महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक म्हणाले, “मे २०१४ मध्ये आरएनए ग्रुपचे संस्थापक अनिल अग्रवाल यांचे निधन झाल्यानंतर कर्मचा-यांचा पगार देण्यात अनियमितता येऊ लागली. २०१६ मध्ये तर कर्मचा-यांना तब्बल सहा महिने पगारच मिळाला नव्हता. फेब्रुवारी २०१८ नंतर तर कर्मचाऱ्यांना अजिबात पगार मिळालेला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना घरचा खर्च चालवणंही कठीण झालं आहे. अखेर त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहिलं.”

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संतोष धुरी आणि चिटणीस केतन नाईक यांच्याकडे आरएनए ग्रुपचे कर्मचारी आपली समस्या घेऊन आल्यानंतर त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना विनंती करणारं पत्र लिहिलं तसंच, ‘मनकासे’चं सदस्यत्व स्वीकारलं.

“महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी दि २४ डिसेंबर २०१९ रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आरएनए संदर्भात पत्र पाठवलं होतं. त्यानंतर कर्मचा-यांच्या मागण्यांविषयीची चर्चा करण्यासाठी आम्ही आरएनए व्यवस्थापनाला सहा जानेवारीला लेखी पत्र पाठवलं. पण त्याला कोणतंही उत्तर व्यवस्थापनाकडून आलं नाही. त्यामुळे आता पुढच्या आठवड्यात आम्ही सर्व कर्मचा-यांना घेऊन आरएनए कार्यालयाबाहेर शांततापूर्ण निषेध आंदोलन करणार आहोत. त्यालाही व्यवस्थापनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, तर मात्र आम्हाला कर्मचा-यांच्या न्याय्य हक्कांसाठी तीव्र आंदोलन करावंच लागेल”, असं ‘मनकासे’चे चिटणीस केतन नाईक यांनी सांगितलं.

“आम्हा कर्मचा-यांना शेवटची रक्कम मिळाली ती मार्च २०१९ मध्ये. पण हा पगार फेब्रुवारी २०१८ चा होता. म्हणजेच फेब्रुवारी २०१८ पासून आम्हाला पगारच मिळालेला नाही”, अशी माहिती आरएनए ग्रुपच्या एचआर विभागाचे माजी महाव्यवस्थापक निलेश कदम यांनी दिली. आरएनएच्या अनुभव अग्रवाल यांनी मारहाण करून धमकी दिली म्हणून कदम यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here