Twitter : @maharashtracity

मुंबई

भिवंडीतील एका उद्यानात खेळत असताना झालेल्या अपघातात दोन वर्षाची चिमुरडी जवळपास ६० टक्के भाजली. मात्र, बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या प्रयत्नातून त्या मुलीला जीवनदान मिळाले आहे. या चिमुरडीची प्रकृती आता स्थिरावली असून तिला घरी सोडण्यात आले आहे.
या घटनेत भिवंडी येथे राहणारी दोन वर्षाची मुलगी जवळच्या एका उद्यानात खेळत असताना तिने घातलेला लांब गाऊन चुकून चिंध्या आणि कचरा जाळण्यासाठी पेटवलेल्या आगीत उडून त्याने पेट घेतला. त्या ठिकाणाहून  जाणाऱ्या पादचाऱ्याच्या लक्षात येताच त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केला. तिला त्वरीत जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले. पुढे तिला बाई जेरबाई वाडिया रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्लॅस्टिक सर्जरी आणि बर्न्स विभागाचे प्रमुख डॉ. शंकर श्रीनिवासन यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने तिच्यावर उपचारास प्रारंभ केला. प्राथमिक स्तरावरील मूल्यांकनानुसार मुलीचा चेहरा, मान, छातीपर्यंतचा भाग आणि हात- पाय हे ६० टक्क्यांपेक्षा जास्त भाजले होते. त्या मुलीला धक्का बसला होता. जीवितहानी होण्याचा धोका असल्याने ती गंभीर अवस्थेत होती. तिच्या वरच्या आणि खालच्या दोन्ही अंगांमध्ये कंपार्टमेंट सिंड्रोम (ऊतींमध्ये वाढलेला दाब ज्यामुळे रक्त प्रवाह थांबतो) विकसित झाला होता, ज्यामुळे तिच्या अवयवांचे कार्य मंदावले होते. ६० टक्के भाजल्यानंतर प्रौढांनाही बरे होणे कठीण असते. मात्र या मुलीने उपचारांना चांगला प्रतिसाद दिला आणि तिच्या तब्येतीत झपाट्याने सुधारणा झाली. तिला घरी सोडण्यात आल्याचे डॉ शंकर यांनी सांगितले.
तिला आयपीसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर कंपार्टमेंट सिंड्रोमवर उपचाराकरिता त्याच दिवशी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. काही दिवसांतच जेव्हा ती यातून बाहेर पडली तेव्हा तिला अनेक संसर्गाचा (क्लेबसिएला आणि कॅन्डिडा) सामना करावा लागला. आता तिच्या तब्येतीत चांगली प्रगती झाली असून रूग्णालयात ओपीडी स्वरूपात पुढील उपचारासाठी बोलावविले असल्याचे डॉ शंकर यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here