वॉशिंग्टन

महाराष्ट्राचं अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्याने अमेरिका दुमदुमली. महाराजांच्या कर्तृत्वाची गाथा सांगताना श्रोत्यांच्या अंगावर अक्षरश: रोमांच उभा राहत होता. अमेरिकेत अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या डॉ. संगीता तोडमल यांनी अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हटला. यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यांसमोरून महाराजांच्या आयुष्यातील शौर्याचा जणू चित्रपटच उलगडला. अमेरिकेत निमित्त दिवाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी डॉ. संगीता यांनी शिवाजी महाराज यांच्या वरील पोवड्याचे गायन केले.

यावेळी यांच्या पोवाडा गायनाने जमलेली सर्व मंडळी छत्रपतीच्या गर्जनेने वीर रसात न्हावून निघाली. त्याच बरोबर छत्रपतीच्या कार्याची ओळख येथील लहान मुलांना झाली.
हा कार्यक्रम लुईविल मराठी मंडळाने आयोजित केला होता. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल होती. अनिला रगाडे यांचे कविता सादरीकरण झाले तर सहसत्राबुद्धे यांनी भाव गीत गायन केले. या वेळी अनेक चिमुकल्यांनी सुद्धा आपल्या कलेने मराठीचा झेंडा परदेशात झळकवला. तसेच या वेळी लेझिम पथकाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी दिवाळी अंक प्रकाशन सोहळा सुद्धा पार पाडला. परदेशात असूनही दिवाळी अंकाची आवड असणं हे वेगळेपण या वेळी पाहायला मिळालं.

कोण आहेत डॉ. संगीता तोडमल?
डॉ. संगीता गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्य करत असून त्या पर्यावरण अभ्यासक आहेत. या बरोबरच साहित्य आणि सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमीच अग्रेसर असतात. भावी पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख राहावी, यासाठी त्या नेहमीच अग्रेसर असतात. मराठी माणसाची अस्मिता म्हणजे शिवाजी महाराज, आणि त्यांचे कार्य पोवाड्याच्या रुपाने यावेळी मांडण्याचा प्रयत्न केला. या पूर्वी त्यांनी अमेरिकेतील शारलेट येथील मराठी मंडळात कार्यक्रम केला होता. दिवाळीनिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संगीता तोडमल यांनी अमेरिकेत भारतीय भाज्या आणि भारतीय शेती फुलवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्या परसबागेत सुमारे 50 हून अधिक वेगवेगळ्या फळभाज्या, फुलबाज्या, पालेभाज्या, वेलवर्गीय भाज्या लावून त्यावर विविध प्रयोग केले आहेत आणि तेही सेंद्रिय पद्धतीत. तसेच घनकचरा व्यवस्थापन सेंद्रिय खतही त्या स्वतः करतात.

अमेरिकेतील अनेक सामाजिक संस्थांबरोबर त्यांच्या उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरण विषयक चळवळ सुरू केलेली आहे. वरील भाग पालेभाज्या फळभाज्या किंवा टेरेस गार्डन परसबाग आशा विविध विषयांवर महिला बचत गट हाउसिंग सोसायटीमध्ये त्या अनेक वर्षे मोफत मार्गदर्शन करतात. तसेच महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर इतर राज्यातही शाळा कॉलेजेस आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये पर्यावरण विषयक व्याख्याने देऊन पर्यावरण संवर्धनाची एक पिढी घडवत आहेत. तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती याचे अमेरिकेत पालन करीत आहेत. पर्यावरणा बरोबरच सांस्कृतिक सामाजिक आणि अध्यात्मिक उपक्रमांचे ही आयोजन करत आहेत. त्यांचे पती इंजिनिअर निलेश इंगुळकर हे पखवाज वादक असून तेही या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मदत करतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here