मुंबई
प्रसिद्ध दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे सिनेवर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. मराठी चित्रपटसृष्टीला नवं वळण देणारे दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. महाराष्ट्राची शान असलेल्या पैलवान खाशाबा जाधव यांचं आयुष्य उलगडण्याचा प्रयत्न नागराज मंजुळे आपल्या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून करणार आहेत.
‘चांगभलं’ असं कॅप्शन लिहून नागराज मंजुळेंनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या वर्षाच्या सुरुवातीलच त्यांनी आपण एक बायोपिक घेऊन येणार असल्याचं जाहीर केलं होतं. तेव्हापासून त्यांच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा होती. मंजुळेंनी खाशाबा चित्रपटाच्या मुहूर्ताचा फोटो पोस्ट केला आहे. अनेक चाहत्यांनी त्यांच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
प्रतिभावंत पैलवान खाशाबा जाधव
साताऱ्याचे खाशाबा जाधव हे एक ऑलिंपिक पद जिंकून भारतासह महाराष्ट्राचं नाव सुवर्ण अक्षरात कोरलं. 1952 मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत खाशाबा जाधव यांनी फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात कांस्यपदक जिंकले. खाशाबा जाधव यांनी जिंकलेले हे पदक तेव्हा ऑलिंपिक स्पर्धेतील स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक पदक होते. या पदकामुके भारताला एक नवीन उमेद मिळाली. खाशाबा जाधव यांनी केलेली ही खूप मोठी कामगिरी होती.
महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास पडद्यावर
खाशाबा जाधव यांची कामगिरी अनन्यसाधारण आहे. फँड्री, सैराट यांसारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटानंतर नागराज मंजुळे खाशाबा जाधव यांचा गौरवशाही इतिहास पडद्यावर मांडणार आहेत. चांगभलं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगितलं जात आहे. खाशाबांना पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. दरम्यान या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात झाली आहे.