Twitter: @SantoshMasole
धुळे
येथील जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आज बारा लेटलतीफ मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर थांबवून
आपल्या प्रशासकीय कामकाजाच्या तत्परतेचा पहिला धक्का दिला. या सर्व कर्मचाऱ्यांचे आज एका दिवसाचे वेतन कपात करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले.
सामान्यजणांच्या पोलीस प्रशासनाकडून असलेल्या दैनंदिन अपेक्षांना आणि त्यांची वेळेत पूर्तता करण्यास अधीक्षक धिवरे यांनी विशेष प्राधान्य देऊन आपल्या “पोलिसिंग”ची सुरुवात केली आहे. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीत विविध स्वरूपाच्या गुन्ह्यांची उकल करणाऱ्या शाखांसह मंत्रालयीन कर्मचाऱ्यांची एक स्वतंत्र शाखा आहे. या विभागाशी संबंधित विविध कामांचा निर्धारित वेळेत निपटारा होणे गरजेचे असल्याने या शाखेत नियुक्त कर्मचाऱ्यांनी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत कर्तव्यावर उपस्थित रहायला हवे.
दरम्यान, दुपारी एक ते दोन वाजेदरम्यान जेवण करून पुन्हा कर्तव्य बजावणे अपेक्षित आहे. तथापि अनेक कर्मचारी त्यांच्या सोयीने कार्यालयात येतात आणि जातातही असे अधीक्षक धिवरे यांच्या निदर्शनास आले. यामुळे धिवरे यांनी आज सकाळी अचानक साडेनऊ वाजेला लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर शिस्तीचे शस्त्र उगारले.
उशिरा आलेल्या बारा जणांना दारातच अडवून कार्यालयाबाहेर उभे करण्याचे आदेश काल संध्याकाळीच संबंधितांना देण्यात आले होते. आज या आदेशाची अंमलबजावणी झाली आणि बारा लेटलतीफ या आदेशाचे बळी ठरले. यात सहा महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अचानक झालेली अशी कदाचित पहिलीवहिली अधीक्षक कार्यालयातील कारवाई सगळ्यांच्याच दृष्टीने धक्कादायक ठरली. या सर्व कर्मचाऱ्यांना समज देण्यात आली आहे. या कारवाईमुळे महिला कर्मचारी मात्र कमालीच्या धास्तावल्या आहेत.
उशिरा आलेल्या सगळ्याच कर्मचाऱ्यांचा आजचा कार्यालयीन कामकाजाचा दिवस बिनपगारी असेल, प्रामुख्याने दैनंदिन कामकाज वेळेवर व्हावे, असा यामागचा मुख्य उद्देश आहे, असे म्हणत धुळ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्वांची कानउघडणी केली.