@maharashtracity

लसीकरणात मुंबई जिल्हा राज्यात पहिल्या क्रमाकांवर कायम

मुंबई: ‘हर घर दस्तक’ या लसीकरण मोहिमेमुळे (vaccination drive) सध्या राज्यात लसीकरण वाढले आहे. राज्यात एकूण प्रौढ लोकसंख्येपैकी ४५ टक्के लोकसंख्येला लसीकरण करण्यात आले आहे. तर मुंबईत दोन्ही डोस मिळून जवळपास ७४ टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मुंबई (Mumbai) जिल्हा राज्यात लसीकरणाच्या आकडेवारीत आजही प्रथम असल्याचे आकडेवारी वरुन स्पष्ट होते.

दरम्यान, ‘हर घर दस्तक’ मोहिमेमुळे देशात पहिल्या डोसचे प्रमाण जवळपास सहा टक्क्यांनी वाढले आहे. तर महाराष्ट्रात हेच प्रमाण ६.८ टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या तीन दिवसांत, राज्यात दररोज सरासरी १० लाख लसीकरण झाले आहे.

हर घर दस्तक मोहिमेसह लसीकरणाचा एकूणच वेग वाढला आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनमुळेही (Omicron variant) लसीकरण वाढल्याचे राज्य अधिकारी सांगतात. राज्याने आतापर्यंत एकूण ११,६२,३२, ५१४ डोस दिले आहेत. तर, ४.१ कोटी नागरिकांना पूर्णपणे लसीकरण केले आहे आणि ७.५ कोटी नागरिकांना किमान एक डोस दिला आहे.

गेल्या चार दिवसांत सर्वाधिक लसीकरण झाले असून २९ नोव्हेंबर ११०९५३१, ३० नोव्हेंबर रोजी १२०७०२६, १ डिसेंबर ९१११९०, तर २ डिसेंबर ९८७२२६ डोस देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. दैनंदिन लसीकरणाच्या वाढलेल्या गतीतून या वर्षाच्या अखेरीस ९.१ कोटी पात्र लोकसंख्येचा किमान एक डोस पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मात्र, आतापर्यंत १.६ कोटी नागरिकांनी अजूनही पहिला डोस घेतलेला नाही. यावर बोलताना राज्याचे लसीकरण प्रमुख डॉ. सचिन देसाई यांनी सांगितले की, राज्यात ९५ लाखांहून अधिक लोक त्यांच्या दुसऱ्या डोससाठी शिल्लक आहेत. हे प्रमाण दररोज वाढत आहे.

पहिला डोस आणि दुसऱ्या डोसमधील ८४ दिवसांचे अंतर बऱ्याच नागरिकांनी पूर्ण केले आहे. तुर्तास डोसची उपलब्धता मुबलक असून राज्यात ६० टक्क्यांपेक्षा कमी एक डोस घेतलेला एकही जिल्हा नाही. तर, २० पेक्षा जास्त जिल्हे संपूर्ण लसीकरणात राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here