By निकेत पावसकर
तळेरे, (सिंधुदुर्ग): तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेचा वार्षिक स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. महाविद्यालयाच्यावतीने मृत्यूपश्चात अवयवदान मोहीमेचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. दळवी महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक विनायक दळवी यांच्या वाढदिवसाचे निमीत्त साधून केलेल्या या उपक्रमात विनायक दळवी यांच्यासह ६४ जणांनी मृत्यूपश्चात अवयव दानाचा संकल्प सोडला. यामुळे या महाविद्यालयाच्या सामाजिक उत्तरदायित्वाबद्दल कौतुक केले जात आहे.
या आभासी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्रसिध्द कृषी उद्योजक व्ही.के सावंत तर अध्यक्षपदी कॅप्टन सौ. नीलिमा प्रभू , सत्यवान प्रभू उपस्थित होते. ‘मरावे परी कीर्तीरुपी उरावे’ या म्हणीला सार्थ ठरवीणारे कार्य दळवी महाविद्यालयाने केले. आपल्या पश्चात दुसऱ्याच्या आयुष्याला नवसंजीवनी देण्याची किमया अवयवदान व देहदानात आहे. श्रीकांत आपटे यांच्या सहकार्याने व सुधीर पुराणिक ह्यांच्या मार्गनिर्देशनाने एन. एस. एस. तर्फे महाविद्यालयाने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला.

महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचा वार्षिक स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने हा संकल्प पूर्ण केला गेला. 3 वर्षांपूर्वीच महाविद्यालयास सक्षम करून शिक्षक व विद्यार्थी यांच्या हातात महाविद्यालय सोपविण्याची घोषणा विनायक दळवी यांनी केली होती. 14 एप्रिल 2021 रोजी तो संकल्प सुद्धा पूर्ण करून महाविद्यालयाच्या सक्रिय कार्यातून त्यांनी निवृत्ती स्वीकारली. त्यांच्या अनुपस्थितीत हा पहिलाच कार्यक्रम संपन्न झाला. मात्र क्रीडा संकुल तयार व्हावे म्हणून त्यांनी चार एकर जमीन देवू केली आहे अशी माहिती महाविद्यालयाचे जेष्ठ शिक्षक व भूदाते हेमंत महाडिक यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात व्ही.के सावंत यांनी गणेश पूजन करून केली. महाविद्यालयाची यशोगाथा श्रद्धा साटम हिने पीपीटीच्या साह्याने दाखवली. विनायक दळवी यांनी संस्कृतमध्ये शब्दबद्ध केलेले महाविद्यालयगीत सहाय्यक प्राध्यापक ओंकार बर्वे यांनी संगीतबध्द करून सादर केले.
महाविद्यालयाचे भुदाते सत्यवान प्रभू यांनी व्ही. के. सावंत यांची ओळख करून कृषी विषयक जीवन परिचय करून दिला. आज समाजामध्ये ६४ रक्तदाते मिळतांना कठीण आहे, त्या ठिकाणी दळवी महाविद्यालयाने काही तासात ६४ अवयवदानाची कायदेशीर नोंदणी करणारे दाते उपलब्ध केलेत, हि खरीच मोठी बाब आहे. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकवर्ग यांचा समावेश आहे.
मृत्यूपश्चात अवयवदान या संकल्पनेच्या क्रूतीचे उद्घाटन व्ही.के सावंत यांनी विनायक दळवी यांचे ऑर्गन डोनेशन कार्ड दाखवून केले. श्री. सावंत हे स्व निर्मिती उद्योजक असून त्यांनी पुढील वर्षी दळवी महाविद्यालयाच्या कृषी विषयक परिषदेस सर्वोत्तपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “दळवी सरांनी 11.25 एकर जागा महाविद्यालयासाठी उपलब्ध करून दिली. त्यातील 7.25 एकर जागा स्वकमाईतून क्रीडासंकुल आणि होस्टेलसाठी उपलब्ध करून दिली.”

महाविद्यालयीन माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात सुप्रिया काडगे, विशाखा तेरवणकर यांचा समावेश होता. त्यानंतर सर्वानुमते तेजस लाड याची माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड यांची करण्यात आली.
कॅप्टन सौ. नीलिमा प्रभू यांनी अध्यक्षीय भाषण केले. या वेळी बोलतांना त्या म्हणाल्या कि, “दळवी सरांनी घालून दिलेला कामाचा वसा आपण घेवून यशाची शिखरे पादाक्रांत करावी. निष्ठा आणि वचनबद्धता हे सूत्र आपल्या जीवनात अंगीकारावे”.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धि राणे हिने करुन आभार प्रदर्शन हेमंत महाडिक यांनी केले.