@Awhadspeaks

By Dr Jitendra Awhad

रेल्वे सुरु झाली आणि आमचा वंजारी समाज (Vanjari community) मोठ्या संख्येने मुंबईत (Mumbai) आला. शिक्षण नाही, गावोगाव भटकूनही शेतमजुरीवर पोट भरत नाही. तेव्हा शारीरिक कष्टच करायचे, तर निदान एका जागी स्थिर होऊन ते करावे असा सूज्ञ विचार त्यांनी गेला असावा.

मुंबईत आल्यावर कुणी हातगाड्या चालवल्या तर कोणी रेल्वे स्टेशनवर हमाली केली. माझे आजोबा हे त्यापैकीच एक. अनेक वर्ष ते बॉम्बे सेंट्रल रेल्वे स्थानकावर (Mumbai Central railway station) प्रवाशांच्या सामानाची ने आण करत होते आणि अनेक वर्ष फलाटावरच राहिले.

मुद्दा वेगळा आहे. आपले हे हाल शिक्षण नसल्यामुळे झाले हे या लोकांना कळलं. मुंबईतील पांढरपेशा वर्ग त्यांनी जवळून पाहिला. आपल्याला ज्या यातना सोसाव्या लागल्या त्या आपल्या पुढच्या पिढ्यांना भोगाव्या लागू नयेत म्हणून या कष्टकरी लोकांनी सिन्नरमध्ये (Sinnar) शाळा काढायचं ठरवलं.

पैसे दोन पैसे आपसात गोळा करून त्यांनी सिन्नरमध्ये काही एकर जागा घेतली. पण आपापल्या आयुष्याचा गाडा ओढण्यात हे लोक इतके व्यग्र होते की शाळेचं घोडं फक्त जमीन घेण्यावरच अडलं. वसंतराव नाईक शिक्षण संस्थेशी संलग्न असलेल्या या प्रस्तावित शाळेची जमीन कित्येक वर्ष ओसाड माळरानासारखी पडून राहिली.

काही लोकांनी उत्साह दाखवून शाळेच्या बांधकामाला सुरुवात करायचा प्रयत्न केला तेव्हा दिसलं की दरम्यानच्या काळात जमिनीवर विजेच्या खांबांचं बांधकाम झालंय आणि वरून वीजवाहक तारा गेल्या आहेत. ते हलवणं हे महाकठीण काम होतं.

प्रकरण मा. शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे गेलं. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावलं. जिल्हाधिकाऱ्यांनी खास नोकरशाहीची उडवाउडवी उत्तरं दिली तेव्हा साहेबांनी त्यांच्या खास शैलीत त्यांचा रुबाब उतरवला.

मा. दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांना सूचना देऊन साहेबांनी खांब हलवायला सांगितले. अर्थातच खांब हलवले गेले. पण आर्थिक भरपाई करायचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा हात वर केले आणि शिक्षण संस्थेने हा भार उचलावा अशी भूमिका घेतली.

यावेळी साहेबांच्या करारीपणाचा पुनश्च प्रत्यय आला. “मुळात एखाद्या संस्थेच्या जमिनीवर तिला न विचारता दुसरं कुठलं बांधकाम होतं याचा अर्थ तुम्ही काय झोपा काढत होतात? ही कष्टकऱ्यांनी रुपया दोन रुपये काढून अक्षरशः घामाच्या पैशातून घेतलेली जमीन आहे. तुमच्या हलगर्जीपणाची शिक्षा सुद्धा त्यांनीच भोगायची का”, अशी कणखर भूमिका साहेबांनी घेतली.

वास्तविक ह्या १४/15 वर्षांपूर्वीच्या गोष्टी आहेत. हे प्रकरण साहेबांपर्यंत नेण्यात माझा पुढाकार होता हे वेगळ्याने सांगायची गरज नाही किंवा त्यातून माझा दिंडोरा पिटायची सुद्धा माझी इच्छा नाही. पण ते आत्ता सांगायचं कारण एवढंच की आज सिन्नरमध्ये या शाळेच्या बांधकामाला माझ्या हस्ते सुरुवात होत आहे.

माझ्या आजोबांनी त्या काळात ही जमीन विकत घ्यायला किती वर्गणी दिली होती हे मला माहीत नाही. ते महत्त्वाचं सुद्धा नाही. महत्वाचं हे आहे की गेली कित्येक दशकं त्या पिढीने पाहिलेलं एक शाळेचं स्वप्न आज साकार होत आहे. त्याचा साक्षीदार मी असेन हेच मला पुरेसं आहे.

सामानाची ओझी वाहून, किंवा हातगाड्या ओढून आपले गुडघे आणि खांदे झिजवून मृत्यू पावलेल्या त्या वंजारी समाजाच्या पिढीला आज मी खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहीन. अमानवी शारीरिक कष्टातून, दुय्यम दर्जाच्या वागणुकीतून त्यांना स्वातंत्र्य हवं होतं. त्याची एक वीट आज रचली जाईल.

वास्तविक, आजच्या समारंभाला पवार साहेब उपस्थित राहणं हे जास्त औचित्यपूर्ण ठरलं असतं. पण ते शक्य झालं नाही. तथापि, या सरस्वतीच्या मंदिराच्या बांधकामाचा मार्ग त्यांनी मोकळा करून दिला याची सिन्नरच्या गोरगरीब जनतेला आणि इथल्या प्रत्येक विटेला आठवण राहील.

डॉ. जितेंद्र आव्हाड

मंत्री, गृहनिर्माण,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here