@maharashtracity

शक्ती कायद्यात तरतूद करण्याचा विचार
गृहमंत्री वळसे पाटील यांचे मनसे शिष्टमंडळाला आश्वासन

महिला अत्याचाराच्या प्रकरणांचा महिन्यातून एकदा गृहमंत्री स्वतः आढावा घेणार

मुंबई: महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शक्ती कायद्यात बलात्काराचा आरोप सिद्ध झालेल्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्याचा विचार असल्याची ग्वाही राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Hone Minister Dilip Walse Patil) यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) शिष्टमंडळाला दिली.

मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी आज शिष्टमंडळासह गृहमंत्र्यांची भेट घेतली आणि महिलांवरील अत्याचारात होत असलेल्या वाढीबद्दल चिंता व्यक्त केली.

साकीनाका येथील ३४ वर्षीय महिलेवर झालेल्या अमानुष बलात्काराच्या घटनेनंतर आणि राज्यात वाढत असलेल्या महिला अत्याचारांच्या घटनेतील वाढ पाहता आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Maharashtra Navnirman Sena) शिष्टमंडळाने आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले.

यात प्रामुख्याने बलात्काराच्या घटनांची प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणे, महिलांवरील अत्याचाराचे एफआयआर घटनेनंतर २४ तासात नोंदवून घेणे, राज्य महिला आयोगाला (State Women Commission) तात्काळ पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा, बलात्कार करणाऱ्या आरोपीला तत्काळ फाशी देण्याची तरतूद शक्ती कायद्यात करावी. त्यासाठी शक्ती कायद्याची राज्यात लवकरात लवकर अंमलबजावणी करावी, पोस्को कायद्यातील पळवाटा दूर कराव्यात, महिलांविषयक प्रकरणांचा स्वतः गृहमंत्र्यांनी दर महिन्यातून एकदा आढावा घ्यावा अशी आग्रही मागणी करण्यात आली.

यावेळी गृहमंत्र्यांनी या सर्व विषयावर मनसेच्या शिष्टमंडळाला समाधानकारक उत्तरे दिली. तसेच काही मुद्द्यावर आपले म्हणणे विस्तृतरित्या सादर करण्यास सांगितले.

यावेळी मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांच्यासह जनहित व विधी कक्षाचे सरचिटणीस ऍड. संतोष सावंत, गोरेगाव महिला विभाग अध्यक्षा धनश्री नाईक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here