@maharashtracity

धुळे-नंदुरबारमधून पटेलांची चौथ्यांदा विधान परिषदेवर निवड

शेवटच्या दिवशी चारही उमेदवारांची माघार

धुळे: राज्यस्तरावर काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात झालेल्या तडजोडीमुळे (political understanding) कोल्हापुरात (Kolhapur) भाजपने काँग्रेसला झुकते माप दिले तर धुळे – नंदुरबार स्थानिक स्वराज्य मतदारसंघात काँग्रेसने (Congress) भाजपला झुकते माप देत परतफेड केली. या तडजोडीमुळे विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदार संघात भाजपचे आमदार अमरिश पटेल (BJP MLA Amrish Patel) यांची बिनविरोध निवड झाली.

महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi – MVA) काँग्रेसचे उमेदवार नगरसेवक गौरव वाणी यांनी शुक्रवारी माघार घेतल्याने निवडणुक निर्णय अधिकार्‍यांनी पटेलांची बिनविरोध निवडीची घोषणा केली. आ.पटेल हे सलग चौथ्यांदा विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले आहेत.

राज्यात विधान परिषदेची निवडणुक जाहीर झाली होती. त्यात धुळे-नंदुरबार (Dhule Nandurbar) जिल्ह्यातील विधान परिषदेचाही समावेश होता. या निवडणूकीत भाजपतर्फे आ.अमरिश पटेल तर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे (Congress) नगरसेवक गौरव वाणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

त्याचबरोबर नंदुरबारमधून चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuwanshi) समर्थक काँग्रेस नगरसेवक दीपक दिघे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली होती. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर (Shyam Saner), भाजपाचे भुपेश पटेल यांनीही डमी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

मात्र राज्यस्तरावर मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. तडजोडीच्या राजकारणातून बिनविरोध निवडीचा फॉर्म्यूला महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये ठरला. त्यानुसार ज्या-ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे प्राबल्य आहे, जेथून ज्यांचा उमेदवार निवडीची शक्यता आहे तेथून दुसर्‍या पक्षाच्या उमेदवाराने माघार घ्यावी असे ठरले. त्यानुसार कोल्हापूरमध्ये काँग्रेसला भाजपाने झुकते माप दिले. भाजपा उमेदवाराने माघार घेतल्याने काँग्रेसचा विजय झाला. त्याचीच परतफेड धुळ्यात झाली.

त्यामुळे महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशावरुन उमेदवार गौरव वाणी यांनी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणुक शाखेत जावून उमेदवारी मागे घेत असल्याचे निवडणुक अधिकार्‍यांना सांगितले. त्या संदर्भातील कागदपत्रांची पुर्तताही त्यांनी केली.

रघुवंशींचे समर्थक मानले जाणारे दीपक दिघे यांनीही माघार घेतली. शाम सनेर, भूपेश पटेल यांनीही माघार घेतली. यामुळे चौघा उमेदवारांच्या माघारीनंतर विधान परिषद निवडणुकीत धुळ्यातून अमरिश पटेल यांनी बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर भाजपातील कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

“आमचा पूर्वीपासूनच विकासाचा अजेंडा ठरलेला आहे. दोन्ही जिल्ह्याचा विकास करणे. जिल्हा परिषद, महानगर पालिकेतील अडचणी सोडविणे याला माझे प्राधान्य आहे. धुळे, नंदुरबार जिल्ह्याच्या विकासात लक्ष घालणार आहे. वरिष्ठ पातळीवर फार्म्यला ठरला. कोल्हापूरची काँग्रेसची जागा बिनविरोध झाल्याने धुळ्यात माझी बिनविरोध निवड झाली.”

  • आ.अमरिश पटेल,
    धुळे-नंदुरबार विधान परिषद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here