@maharashtracity

मुंबई: मुंबई अग्निशमन दलाच्या नरीमन पॉइंट येथील प्रमुख अधिकारी उत्कर्ष बोबडे (३८) यांचा गुरुवारी रात्री झोपेतच मृत्यू झाला. अग्निशमन दलाचे प्रशिक्षण पूर्ण करून आल्यानंतर बोबडे यांचा घरी झोपेतच मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. (Fire fighter officer died due to heart attack)

त्यांच्या मृत्यूने अग्निशमन दलातील त्यांचे सहकारी व कुटुंबीय यांना जबर धक्का बसला आहे. बोबडे यांचा मृत्यू हा कर्तव्यावर असताना झाला आहे, अशी नोंद करण्यात यावी, या मागणीसाठी त्यांचे कुटुंबीय व काही अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा मृतदेह काही काळ ताब्यात घेण्यास नकार दर्शवला होता.

मात्र, नंतर अग्निशमन दलातील कामगार संघटना हाताळणारे कामगार नेते ऍड. प्रकाश देवदास यांनी, अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर या मृत अधिकाऱ्याचा मृतदेह ताब्यात घेऊन त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

उत्कर्ष बोबडे हे सन २००६ साली अग्निशमन दलात भरती झाले होते. सध्या ते नरीमन पॉइंट येथील अग्निशमन केंद्रावर प्रमुख अधिकारी म्हणून कार्यरत होते. गुरुवारी वडाळा येथील कमांडिंग सेंटरमध्ये सकाळी ७.३० ते दुपारी १.३० या कालावधीत त्यांनी विशेष प्रशिक्षण घेतले. यावेळी त्यांनी २० किलो वजन पाठीवर घेऊन श्वसन उपकरणाने सरावही केला.

शिडी चढणे, ट्रेड मिल, सायकल चालवणे, छोट्या आणि वाकड्या-तिकड्या पाइपमधून २० किलो वजन घेऊन दुसऱ्या बाजूला जाणे हे अतिशय जोखमीचे प्रशिक्षण त्यांनी घेतले होते. सराव पूर्ण करून घरी गेल्यानंतर ते झोपले ; मात्र त्यानंतर त्यांच्या शरीराची कोणतीच हालचाल होत नसल्याचे त्यांच्या कुटुंबियांच्या निदर्शनास आले. त्यांचे झोपेतच निधन झाले होते, अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी दिली.

याप्रकरणी, अग्निशमन दलातील उप प्रमुख अधिकारी राजेंद्र चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी उत्कर्ष बोबडे हे अग्निशमन दलातील एक उत्कृष्ठ व कार्यक्षम अधिकारी होते व त्यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच आम्हाला मोठा धक्का बसल्याचे सांगितले.

बोबडे यांच्या मृत्यूबाबत कोणताही वाद होण्याचे कारणच उद्भवत नाही. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना ते कामावरून, प्रशिक्षणावरून जरी घरी परतल्यानंतर त्यांचा झोपेत मृत्यू झाला असला तरी त्याबाबत काही वाद उपस्थित होण्याचे कारणच उद्भवत नसल्याचे चौधरी यांनी सांगितले.

त्यांच्या कुटुंबियांना पालिकेतर्फे जे आवश्यक देणी लागतील ती सर्व दिली जातील. त्यात कोणत्याही प्रकारची बाधा कोणालाही आणता येणार नाही, असे चौधरी यांनी सांगितले. त्यामुळे उत्कर्ष बोबडे यांच्या मृत्यूबाबत जी काही बाब उद्भवली ती निरर्थक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अग्निशमन दलाने एका चांगल्या कर्तृत्ववान, सक्षम व जिगरबाज अधिकाऱ्याला गमावले असंल्याचे सांगत आपल्या दुःखद भावना व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here