@maharashtracity

राष्ट्रपती पदकासाठी खोटी माहिती दिल्याने नोकरीवर गदा येणार

मुंबई: मुंबई अग्निशमन दलाच्या (Fire brigade) प्रमुख अधिकारी पदाचा प्रभारी असा कार्यभार असतानाही केवळ राष्ट्रपती पदक (President’s Award) मिळविण्यासाठी आपणच प्रमुख अधिकारी असल्याचे भासवून दिशाभूल केल्याचे उघडकीस आल्याने तत्कालीन उप प्रमुख अधिकारी शशिकांत काळे यांना पालिकेच्या कारवाईला सामोरे जात प्रभारी पद व राष्ट्रपती पदकाच्या स्वप्नावरही पाणी सोडावे लागत आहे.

आता त्यांचा सखोल चौकशी अहवाल आला आहे. त्यानुसार त्यांना दोषी ठरविण्यात आले असून पालिका आयुक्तांनी (BMC Commissioner) त्यांना नोकरीतून (dismiss) करण्याची शिफारस केली आहे.

त्यामुळे आता शशिकांत काळे यांच्यावर राष्ट्रपती पदक व नोकरी दोन्ही गमविण्याची वेळ आली आहे. पालिका आयुक्तांच्या या धाडसी कारवाईमुळे अग्निशमन दलात खळबळ उडाली आहे.

यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी पालिका प्रशासनाकडून सादर करण्यात आला आहे. स्थायी समिती व पालिका सभागृहाकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर त्यावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

त्यामुळे यापुढे अधिकारी पदाचा गैरफायदा घेऊन आणि पालिकेची दिशाभूल करून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अशा कारस्थानांना आता चांगलाच चाप बसणार आहे.

मुंबई अग्निशमन दलाच्या प्रमुख अधिकारी पदावरील प्रभात रहांगदळे यांची काही कारणास्तव पालिका आयुक्तांच्या आदेशाने उपायुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन विभाग) येथे बदली करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या जागेवर तत्कालीन उप प्रमुख अधिकारी शशिकांत काळे यांची प्रभारी अधिकारी म्हणून १० ऑगस्ट २०२० रोजी नेमणूक करण्यात आली होती. तत्पूर्वी ते ठाणे अग्निशमन दलात कार्यरत होते.

काळे यांनी मुंबई अग्निशमन दलाच्या प्रमुख पदाचा प्रभारी म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी स्वतःची ओळख प्रमुख अधिकारी म्हणून सर्वत्र दाखविणे सुरू केले होते. त्यातच मुंबई अग्निशमन दलातील गुणवंत अधिकारी म्हणून राष्ट्रपती पदकासाठी शिफारसी सादर करण्यात आल्या होत्या.

त्यासाठी काळे यांनी आपली ओळख अग्निशमन दलाचे प्रभारी ऐवजी प्रमुख अधिकारी म्हणून दाखवली होती. वास्तविक ते प्रभारी म्हणून कार्यरत होते. तसेच, गोपनीय अहवालातही चुकीची माहिती दिली होती. तसेच, ते २०१४ – १५ मध्ये एका प्रकरणात एक वर्ष निलंबित होते.

त्यांनी दिशाभूल करणारी व असत्य माहिती दिल्याचे प्राथमिक चौकशीत उघडकीस आले व त्यामुळे त्यांना त्या प्रभारी पदावरून तात्काळ हटविण्यात आले. तसेच, त्यांची खात्याअंतर्गत चौकशी करण्यात आली. त्यात त्यांना दोषी ठरविण्यात आले आहे.

राष्ट्रपती पदकासाठी करण्यात आलेली शिफारस मागे घेण्याची नामुष्की अग्निशमन दल व पालिकेवर ओढावली. त्यांच्या या चुकीच्या कामामुळे अग्निशमन दल व पालिकेची प्रतिमा मलिन झाली. त्यामुळे पालिका आयुक्त यांच्या आदेशाने त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here