@maharashtracity

मुंबई: कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या पुणे शहरात आरोग्य व्यवस्था मजबूत करणाऱ्या पुणे महापालिकेतील तेव्हाच्या अतिरिक्त आयुक्त आणि आता राज्याच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या (ICDS) आयुक्त रुबल अग्रवाल (IAS Rubal Agrawal) यांना नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी विशेष ‘गिफ्ट’ मिळाले आहे.

कोरोना काळातील (corona pandemic) त्यांच्या कामाची दखल घेत, प्रशासकीय सेवेतील मानाचा राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगिरवार उत्कृष्ट प्रशासक पुरस्काराचा (Award for Best Administrator) मान अग्रवाल यांना मिळाला आहे. अग्रवाल यांच्यासह गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल (Gadchiroli SP Ankit Goyal) यांनाही या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

पुण्यात (Pune) मार्च २०१९ मध्ये कोरोनाचा पहिल्या रुग्ण सापडल्यानंतर आरोग्य व्यवस्थापनाची जबाबदारी अग्रवाल यांच्याकडे आली. रुग्णांसाठी बेड मॅनेजमेंटपासून (Bed Management) उपचार व्यवस्था, गरीब रुग्णांसाठी जम्बो कोविड सेंटरची (Jumbo Covid Centre) उभारणीसह त्याच्या व्यवस्थापनात अग्रवाल आघाडीर होत्या.

रुग्णसंख्या आणि त्यापाठोपाठ मृत्यूदर वाढल्यानंतर नव्या हॉस्पिटलची करून कमीत-कमी कालावधीत रुग्णांसाठी उपचाराची सोय करण्याला त्यांनी प्राधान्य दिले. दुसरीकडे, खासगी हॉस्पिटलमधील बेड ताब्यात घेऊन कोरोनाच्या रुग्णांवरील उपचारास तेथील व्यवस्थापनाला भाग पाडले गेले. त्यामुळे पुणे आणि आजूबाजुच्या जिल्ह्यांतील रुग्ण, त्यांच्या नातेवाइकांना दिलासा मिळाला.

ऑक्सिजनच्या (oxygen) कमतरतेमुळे रुग्णांना धोका होऊ नये, म्हणून ऑक्सिजन बचतीचा प्रयोगही त्यांनी यशस्वी करून दाखविला. अशातच खासगी हॉस्पिटलमधील आक्सिजन संपल्याने मृत्युशी झुंज देणाऱ्या ९ रुग्णांना दीड तासांत महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आणण्याचे धाडस अग्रवाल यांनी केले होते.

जम्बो कोविड सेंटर आणि सरकारी रुग्णालयांतील मृत्यूदर कमी (mortality rate) करण्याच्या हेतुने पुरेशा प्रमाणात डॉक्टरांची संख्या उपलब्ध करण्यावर त्यांचा भर होता. दुसऱ्या लाटेत महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ‘रेमडेसिव्हिर इंजक्शन’चा काळाबाजार (black market of Remdesivir) रोखण्यासाठी अग्रवाल यांनी स्वतंत्र यंत्रणांना उभारून त्याचे नियोजन केले होते.

दरम्यान, ‘म्युकरमायकोसिस’च्या (Mucormycosis) संसर्गाच्या भीतीने रुग्णांत प्रचंड भीती पसरली असतानाच त्यांनी मोफत शस्त्रक्रियेसाठी महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ‘म्युकरमायकोसिस’ चा स्वतंत्र विभाग सुरू केला. कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात अशा पातळ्यांवर धडाडीने केलेल्या कामाचा गौरव म्हणून अग्रवाल यांना बोंगिरवार यांच्या नावाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्रशासकीय सेवेत बोंगिरवार यांच्या नावाचा पुरस्कार प्रतिष्ठेचा मानला जातो. येत्या ६ जानेवारीला या पुरस्काचे वितरण होणार असून, त्यासाठी अरुण बोंगिरवार फाउंडेशनच्या (Arun Bongirwar Foundation) वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले. त्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here